शिल्पाताई पटवर्धन यांचे मत; 'मुकुल माधव'च्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


पुणे :- आत्मविश्वास, मेहनतीच्या जोरावर स्वप्नपूर्ती शक्य



पुणे : "प्रत्येकामध्ये आपल्या स्वप्नपूर्तीचे सामर्थ्य असते. परिस्थितीशी जुळवून घेताना तुम्ही कसे सामोरे जाता आणि विचार करता, यावर तुमचे यशापयश अवलंबून असते. 'मला हे जमेलच' अशा आत्मविश्वासाने आपण कार्यरत राहिलो तर यश हमखास मिळते. रोज नवीन एक गोष्ट शिकली पाहिजे. नियोजनपूर्वक मेहनत केली, तर तुमची स्वप्नपूर्ती निश्चित होते," असे मत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ शिल्पाताई पटवर्धन यांनी व्यक्त केले.


फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन संचालित मुकुल माधव कनिष्ठ महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पटवर्धन बोलत होत्या. प्रसंगी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक संजय मठ, ऍड. रुची महाजनी ,श्री. काकडे, शिक्षिक वर्ग, विद्यार्थी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. रत्नागिरी येथे सोमवारी सोशल डिस्टंसिंग व अन्य नियमांचे आणि स्वच्छतेच्या खबरदारीचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम झाला. माध्यमिक शालांत परीक्षेत मिळालेल्या १००% यशानंतर शिक्षणाचा हा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने, तसेच ग्रामीण भागातील मुलांना पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी देण्यात येणार्‍या उच्च प्रतीच्या शिक्षणाचा दर्जा कायम टिकवत मुकुल माधव फाउंडेशनतर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कनिष्ठ महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या ऑनलाइन वर्गांचे वेळापत्रक ठरविण्यात आले. २९ सप्टेंबर २०२० पासून विज्ञान आणि वाणिज्य या शाखांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू होतील. यावेळी विद्यार्थ्यांनी येथील इमारती, पायाभूत सुविधा आदींबाबत आनंद व्यक्त करत व्यवस्थापनाचे आभार मानले.


----------------------------


"रत्नागिरीमधील ग्रामीण भागात पुण्या-मुंबईच्या दर्जाचे शिक्षण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शालांत स्तरावर मुकुल माधव विद्यालयाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. आता कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरही येथील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग पुरवून गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे."


- रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन