पुणे प्रवाह न्युज पोर्टल
खाटा रिकाम्या तरीही दमछाक;
लोकप्रतिनिधी, काही महत्त्वाच्या व्यक्तींकडून खाटा राखीव ठेवण्यासाठी दबाव......
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोंबिवली आणि भिवंडीतील करोना रुग्णालयांमध्ये सुमारे तीन हजार खाटा उपलब्ध असून तरीही या रुग्णालयामध्ये प्रवेश मिळविताना सामान्य रुग्णांची दमछाक होत आहे. मात्र, महत्वाच्या रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवल्या जात असून लोकप्रतिनिधी, नेतेमंडळींकडून त्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. डोंबिवली पूर्व भागात दररोज १५० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून पालिका कर्मचारी डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयाने शिफारस केल्याप्रमाणे सावळाराम महाराज क्रीडासंकुल, पाटीदार भवन, डोंबिवली जीमखाना किंवा भिवंडी जवळील टाटा आमंत्रा केंद्रात करोना रुग्ण दाखल केले जातात. मात्र, तेथे तपासल्यानंतर रुग्णाला अनेकदा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते अशा तक्रारी आहेत. मागच्या आठवडय़ात ऑक्सिजन पातळी खाली असलेल्या करोना रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी कर्मचारी सावळाराम महाराज क्रीडासंकुलात गेले. त्या रुग्णाला तपासल्यानंतर तेथील डॉक्टरांनी ‘या रुग्णाला आम्ही येथे दाखल करून घेऊ शकत नाही’ असे उत्तर दिले. अखेर अर्धा तासाच्या वादावादीनंतर त्या रुग्णाला सावळाराम महाराजमधील रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. दुसऱ्या एका प्रकरणात ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णाला घेऊन रुग्णाचे नातेवाईक पहाटे तीन वाजता सावळराम महाराज रुग्णालयात घेऊन गेले होते. शिफारसपत्र देऊनही तेथे त्याला दाखल करून घेतले जात नव्हते. अशावेळी या रुग्णालयांवर नियंत्रक असलेले वैद्यकीय अधिकारी खासगी रुग्णालयांची बाजू घेऊन रुग्णाला खासगी रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले जाते.