देशाच्या विकासात सहकार चळवळ महत्वपूर्ण राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम; 'आयसीएआय' आयोजित 'सहकार संवाद'चे उद्घाटन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


देशाच्या विकासात सहकार चळवळ महत्वपूर्ण


राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम; 'आयसीएआय' आयोजित 'सहकार संवाद'चे उद्घाटन


 


पुणे : "ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली सहकार चळवळ देशाच्या विकासात अत्यंत महत्वपूर्ण आहे. साखर उद्योग, दूध, बँकिंग, गृहरचना आदीमध्ये सहकार क्षेत्र विस्तारले आहे. राज्य आणि केंद्र सरकारही सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे या सहकार क्षेत्राला नव्या धोरणांना अवलंबून उभारी देण्यासाठी, तसेच त्यात सुसूत्रता आणण्यासाठी सनदी लेखापाल आणि सीए इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा," असे मत राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. 


 


दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या (पीडीसी) संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'सहकार संवाद' कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कदम यांच्या हस्ते झाले. प्रसंगी 'आयसीएआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अतुलकुमार गुप्ता, उपाध्यक्ष सीए निहार जांबूसारिया, 'आयसीएआय पीडीसी'चे चेअरमन सीए श्रीनिवास जोशी, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, माजी सदस्य सीए डॉ. एस. बी. झावरे, पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, डब्ल्यूआयआरसीचे चेअरमन सीए ललित बजाज, सहकार समितीचे चेअरमन सीए यशवंत कासार यांच्यासह सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.


 


डॉ. विश्वजित कदम म्हणाले, "सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांना मालकी किंवा त्यांची भागीदारी मिळते. महाराष्ट्र सहकार चळवळीचे केंद्र आहे. देशाच्या इतर राज्यातंही सहकार चळवळ वाढलेली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या चळवळीला आपण सर्वानी अबाधित ठेवले पाहिजे. सहकार क्षेत्रात अनेक नियंत्रण संस्था आहेत. सरकारने सहकारी बँकांसंबंधी केलेल्या नवीन दुरुस्त्यांमध्ये सहकार क्षेत्राला चांगले काम करण्यासाठी सनदी लेखापालांनी मार्गदर्शन करावे."


 


सीए अतुलकुमार गुप्ता म्हणाले, "सहकार क्षेत्राने ग्रामीण भागात उद्योजकतेला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन दिले. बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलाना रोजगार मिळाला. सहकार क्षेत्राला गती देण्यासाठी सीए इन्स्टिट्यूट रचनात्मक काम करत आहे. सहकार क्षेत्र देशाच्या विकासाचे इंजिन आहे." सीए डॉ. एस. बी. झावरे, सीए चंद्रशेखर चितळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


 


सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत-प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी सांगितले. सीए श्रीनिवास जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सहकारी बँकांचे ऑडिट, करप्रणाली, सहकार चळवळ आणि अर्थव्यवस्था, सहकार क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान, सहकार क्षेत्रात सीएची भूमिका, सहकार क्षेत्र आणि जीएसटी आदी विषयांवर या दोन दिवसीय सत्रात चर्चा होत आहे.