फिटझ्गेराल्ड कारंज्याची डागडुजी; ऑक्टोबरनंतर मुंबईकरांना दर्शन......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


६० वर्षांपूर्वी हटवलेले कारंजे पुन्हा मेट्रो चौकात....


फिटझ्गेराल्ड कारंज्याची डागडुजी; ऑक्टोबरनंतर मुंबईकरांना दर्शन......


 


 मुंबई : तब्बल ६० वर्षांपूर्वी हटविण्यात आलेला ब्रिटिशकालीन ४० फूट उंच फिटझ्गेराल्ड कारंजा पुन्हा दक्षिण मुंबईमधील मेट्रो चौकात उभारण्याच्या हालचालींना गती आली आहे. धूळ खात पडलेल्या या कारंजाने आता कात टाकली असून येत्या ऑक्टोबरमध्ये तो मेट्रो चित्रपटगृहासमोरील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत चौकाची (मेट्रो चौक) शोभा वाढवणार आहे. ब्रिटिशांनी मुंबईमध्ये अनेक दिमाखदार वास्तू उभ्या केल्या. तसेच मुंबईच्या वैभवात वाढ करण्यासाठी काही शिल्पे, कारंजे आदी उभे केले. त्यापैकीच एक म्हणजे धोबीतलाव (आताचा मेट्रो चौक) येथे उभारण्यात आलेला फिटझ्गेराल्ड कारंजा. मुंबईमध्ये १८६७ ते १८७२ या काळात सेमूर फिटझ्गेराल्ड गव्हर्नर होते. त्यांच्या स्मरणार्थ १८६७ मध्ये हा ४० फूट उंच आणि १९ फूट रुंद कारंजा उभारण्यात आला. ओतीव लोखंडाच्या या कारंजावरील नक्षीकाम आणि दिव्यांमुळे तो आकर्षण बनला होता. मेट्रो चौकाच्या मधोमध असलेला हा कारंजा वाहतुकीस अडथळा बनू लागला आणि १९६०च्या सुमारास तो हटविण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान मुंबईतून ब्रिटिशकालीन खुणा हटविण्यात आल्या. त्या वेळी हा कारंजाही हलविण्यात आल्याचे बोलले जाते. काळपरत्वे मेट्रो चौकातील परिस्थिती बदलली. तेथे काही वाहतूक बेटे उभी राहिली आहेत. त्यामुळे आता मध्यभागी हा कारंजा उभारणे अडचणीचे बनले आहे. परिणामी, या चौकातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्धपुतळ्यासमोरील वाहतूक बेटावर हा कारंजा उभारण्यात येईल. गेली ६० वर्षे अडगळीत पडलेला हा कारंजा आणि त्यावरील दिव्याची डागडुजी करण्यात आली आहे.