कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणांमधील समन्वय महत्वाचा - राज्यमंत्री दतात्रय भरणे         

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


      


इंदापूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा


पुणे दि.3 : - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणांमधील समन्वय महत्वाचा असून मृत्यूदर कमी करणे, कोरोना निदानासाठीच्या चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करणे तसेच इतर आजार असणा-या व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक यांना वेळीच ओळखून त्यांची आरोग्य तपासणी व उपचार करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज प्रशासनाला दिल्या. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत. घाबरु नका शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.


 इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात राज्यमंत्री श्री.भरणे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एकत्रित इंदापूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार सोनाली मेटकरी आदी उपस्थित होते.


 राज्यमंत्री भरणे म्हणाले,कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेला गती देणे आवश्यक असून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.


             कोरोना प्रतिबंधासाठी आपल्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थितपणे पार पाडावी. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु या, असे सांगून इंदापूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचा शोध घेवून शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. ' चेस दि व्हायरस ' संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देताना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, ज्येष्ठ नागरीक, इतर आजार असलेले नागरीक यांची सातत्याने आरोग्य तपासणी करावी, आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी टास्क फोर्समार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.


 इंदापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत बेड उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढविण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक साधनसामग्रीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर यासह शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागात सर्व्हेक्षणावर अधिक भर देणे आवश्यक आहे. यामध्ये सर्दी, ताप, खोकला व लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने आरोग्य तपासणी करा, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करावी,असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.


 यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


                                                             0 0 0 0