जम्बोमधील 28 रुग्णांना डिस्चार्ज, सुधारित व्यवस्थेबाबत रुग्ण समाधानी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे : जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. आज (शनिवारी) 28 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.


आयसीयूमधील रुग्णही पूर्ण करोनामुक्त होत आहेत. येथील व्यवस्थापनाबाबत रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत.


येथे उपचार घेऊन महिला, वृद्ध, व्याधीग्रस्त असे सर्व करोना रुग्ण बरे होत आहेत. 'जम्बो'मध्ये आयसीयू वॉर्डमध्ये गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या दिलीप गवळी यांच्यावर डॉक्टरांनी तातडीने योग्य उपचार केले. आठ दिवस उपचारांनंतर ते करोनामुक्त झाले आहेत. रुग्णांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन महापौर मुरलीधर मोहोळ वैयक्तिक लक्ष देऊन यंत्रणा राबवत आहेत. यामुळे अत्यंत चांगली सेवा उपलब्ध होत आहे, असे गवळी यांचे नातेवाईक अमोल साठे यांनी सांगितले. 


मी एकवीस दिवस जम्बो सेंटरमध्ये होते, मात्र अजिबात त्रास जाणवला नाही. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली, असे करोनामुक्त झालेल्या महिला रुग्णाने सांगितले.


रुबल अग्रवाल म्हणाल्या, "जम्बो'मधील व्यवस्थेत सातत्याने सकारात्मक बदल व सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणाम रुग्ण सेवेत दिसून येत आहे. रुग्ण व नातेवाईकांशी जास्तीत जास्त समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुग्ण प्रशासनाचे धन्यवाद देत आहेत."


डिस्चार्ज नंतरही घरी सर्व खबरदारी घ्यावी. कुटुंबीयांसह नियमांचे पालन करावे. पुन्हा त्रास जाणवल्यास त्वरीत जम्बो'मध्ये उपचार केले जातील. निगेटिव्ह चाचणी आल्यावरच कामावर जावे, असे आवाहन येथील डॉक्टरांनी केले.