कोविड केअर सेंटरला गरम पाणी मशिन व सेवकांचा कृतज्ञता सन्मान - जनता बँक स्टाफ वेल्फेअर सोसायटी, पुणे चा उपक्रम ; उपमहापौर सरस्वती शेंडगे यांची उपस्थिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मिळणारी समाजाविषयीचे दायित्व पार पाडण्याची शिकवण आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचे कर्तव्य जनता बँकेतील कर्मचा-यांनी प्रत्यक्षात आणले. शहराच्या मध्यभागात असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सेवा देण्याचे काम करणा-या सेवकांचा कृतज्ञता सन्मान करण्यासोबतच कोविड केअर सेंटरला गरम पाणी मशिनही देण्यात आले. 


 


जनता बँक स्टाफ वेल्फेअर सोसायटी, पुणे तर्फे सणस मैदान आणि रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित आबासाहेब गरवारे कॉलेज कोविड केंद्राला एकूण ७ गरम पाणी मशिन देण्यात आली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आशिष महादळकर, नगरसेवक गोपाळ चिंतल, जनता बँकेचे संचालक बिरुशेठ खोमणे, कोविड केंद्राचे प्रमुख डॉ.अमोल राठोड, सोसायटीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, विजय फाटक, सचिन आंबेकर, शरद शिंदे, विजय धोत्रे, अविनाश निरगुडे आदी उपस्थित होते. कर्मचा-यांना २ मास्क, मिठाई बॉक्स, सॅनिटायझर भेट म्हणून देण्यात आले. 


 


सरस्वती शेंडगे म्हणाल्या, पुणे मनपातर्फे सर्व रुग्णांची चांगली व्यवस्था करण्यात येत आहे. नायडू रुग्णालयानंतर सणस मैदान हे केंद्र सुरु झाले. त्यामुळे तेथे चांगल्या सुविधा देण्याचे पालिकेसमोर आव्हान होते. परंतु तेथे कर्मचा-यांनी केलेले चांगले काम आणि जनता बँक स्टाफ वेल्फेअर सोसायटीसारख्या संस्था पुढे आल्याने उत्तम सुविधा देणे शक्य झाले आहे.


 


बिरुशेठ खोमणे म्हणाले, आपण समाजाचे देणे लागतो, असे संस्कार संघामध्ये दिले जातात. देशावर आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक वेळी संघाचे स्वयंसेवक पुढे असतात. कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर असून भारतात मोठया प्रमाणात संघाने मदतकार्य केले आहे. 


 


किशोर चव्हाण म्हणाले, जनता बँकेतील कर्मचा-यांनी सामाजिक दायीत्वाच्या भूमिकेतून कोविड केअर सेंटरला ही मदत दिली आहे. यापूर्वी अनेकदा अशा प्रकारची मदत व प्रत्यक्ष आर्थिक निधी देखील मदत म्हणून दिला आहे. समाजाप्रती कार्यातून ॠण व्यक्त करण्याचे संस्कार नव्या पिढीला संघाच्या शाखेतून मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येक आपत्तीच्या काळात संघ स्वयंसेवक सर्वत्र कार्यरत असतात.  


 


* फोटो ओळ : जनता बँक स्टाफ वेल्फेअर सोसायटी, पुणे तर्फे सणस मैदान आणि रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित आबासाहेब गरवारे कॉलेज कोविड केंद्राला गरम पाणी मशिन देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर