पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- दुर्वा नंतर स्टार प्रवाहच्या 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत दिसणार हटके अंदाजात
स्टार प्रवाहच्या दुर्वा मालिकेतून केशव या व्यक्तिरेखेद्वारे घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अटकरी 'फुलाला सुगंध मातीचा' या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहसोबतची हर्षदची ही दुसरी मालिका.
या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना हर्षद म्हणाला, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की बाप्पाच्या आशीर्वादाने गणेशोत्सवाच्या धामधुमीत माझ्या नव्या मालिकेचा श्रीगणेशा होतोय. स्टार प्रवाहच्या 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत मी शुभम ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. या मालिकेचं शूटिंग करताना मला दुर्वा या मालिकेचे दिवस आठवतात कारण मालिकेचे दिग्दर्शक दीपक नलावडे यांच्यासोबत मी दुर्वामध्येही काम केलं होतं. दिग्दर्शकांची तीच टीम या मालिकेतही आहे. केशव या पात्राच्या पूर्णपणे वेगळं पात्र मी 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत साकारतो आहे. अतिशय शांत आणि मवाळ असं हे पात्र आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूपच उत्सुक आहे. 2 सप्टेंबरपासून रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर ही मालिका भेटीला येईल.