कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**


  पुणे दि.28- कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.


      बाणेर येथील पुणे महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, भिमराव तापकीर, माजी महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.


  उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधा, ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था असणारे कोविड रुग्णालये सुरु करण्यात येत असून या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. रुग्णालयाच्या उभारणीमध्ये उद्योजक, महानगर पालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या सर्वांनी चांगले काम केले आहे. यांच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. या कोविड रुग्णालयामुळे पुणेकरांना याचा चांगला उपयोग होईल. आपण सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सामजिक अंतर राखणे या नियमांचे देखील पालन केले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असेही ते म्हणाले. हे कोविड रुग्णालय उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


  विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिशय चांगले रुग्णालय उभारल्याबद्दल मी पुणे महानगर पालिकेला प्रथम शुभेच्छा देतो. ज्यांनी या कामासाठी मदत केली त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली असून पुणे महानगरपालिकेने जास्तीत जास्त तपासण्या करुन कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, असेही ते म्हणाले.


   कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.


००००