पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : कोविड-१९ च्या प्रकोपा पासून बचावासाठी थर्मल स्कैनर तसेच पल्स ऑक्सीमिटर ची आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआई फ़ाउंडेशनच्या ‘स्त्रीधन’ या स्टेट बँक लेडीज क्लबच्या वतीने आज थर्मल स्कैनर तसेच पल्स ऑक्सीमिटर चे वितरण करण्यात आले.
पुणे विमानतळावरील सी.आय.एस.एफ़., पुणे आर.टी.ओ., पिंपरी चिंचवड आर.टी.ओ., सांगवी पोलीस ठाणे, लष्कर पोलीस ठाणे, जनरल लेबर कमिशनर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व युनिटी फॉर फ्रिडम फाऊंडेशन या संस्थांना भारतीय स्टेट बँकेचे उप महाप्रबधक पी. शेषू बाबू यांच्याहस्ते सदर वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. पी. शेषु बाबु यांनी सांगितले कि, भारतीय स्टेट बँक "कार्पोरेट सामाजिक दायित्व" उपक्रमाद्वारे भारतीय स्टेट बँकेच्या सामाजिक सेवा विभागाच्या माध्यमातून संपूर्ण देशात अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, कृषिविकास, जलसंधारण, वृक्षारोपण, ग्रामीण आर्थिक उन्नती आदी कार्यक्रम सातत्याने राबवित असते. समाजाप्रति कर्तव्य व जबाबदारीच्या भावनेतून बँक कोरोनाच्या या राष्ट्रीय आपत्तीतही अखंडित आर्थिक सेवा देण्याबरोबर मदत कार्याला देखील प्राधान्य देत आहे. सध्याच्या कोविड-१९ महामारीच्या संकट काळात पुणे शहर व ग्रामीण भागातील मजुरांना अन्नधान्य व किराणा सामानाचे वितरण केले. अन्नामृत-इस्कॉनच्या साहाय्याने पुणे व पिंपरी चिंचवडमधील गरीब वस्त्यामध्ये प्रतिदिन अंदाजे २५०० गरजू लोकांना तयार अन्न सातत्याने २५ दिवस वितरित करण्यात आले. पुण्यातील तीन नामांकित सरकारी हॉस्पिटल्सना तीन व्हेंटीलीटर्स, पूना हॉस्पिटलला ४०० एन९५ मास्क, पुणे महानगरपालिकेला १२०४ पीपीई किटस, पुण्यातील पोलीस बांधवाना मास्क, फेसशील्ड व सॅनिटायजरचे वितरण करण्यात आले. स्टेट बँकेच्या शाखामध्ये सुध्दा कोविड-१९ संदर्भात ग्राहकांच्या सुरक्षेसंबंधी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. दिनांक १ जुलै या स्टेट बँकेच्या बँक डे निमित्त पुण्यातील विविध ठिकाणी ५००० पेक्षा जास्त झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक अरुण हजारे, असिस्टंट कमांडंट जी जी भार्गव, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर अश्विनी स्वामी, गणेश पासलकर, तानाजी शेजवळ व युनिटी फॉर फ्रिडम फाऊंडेशनचे अध्यक्ष भगवान वायाळ आदी मान्यवर तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे समन्वयन, नियोजन व संचालन श्री. जयंत सिन्हा, श्री.कृष्ण कुलकर्णी व श्रीमती शशि पाटील यांनी यशस्वी केले.