पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*
"मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रिय* *कार्यालयानिहाय व्यवस्था*
*पुणे ( प्रतिनिधी) :-* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करत नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे, ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे फक्त अशाच नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी १ फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाच प्राधान्य द्यावे. तसेच घरीच' श्रीं' चे विसर्जन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सोडीयम बायकार्बोनेट मोफत पुरविण्यात येणार आहे. मूर्ती विक्रेते, प्रभागातील आरोग्य कोठ्या व क्षेत्रीय कार्यालयाचे ठिकाणी सोडीयम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे,' महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की,' या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा शाडू मातीच्या मूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अनंत चर्तुदशीला विसर्जन करून परत देव्हाऱ्यात ठेवता येऊ शकते. तसेच ज्या नागरिकांना मूर्तीचे दान करायचे असेल त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांचे मार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.'
'गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी पुणे शहरात जवळपास पाच लाख 'मूर्तीचे विसर्जन होते आणि जवळपास वीस ते पंचवीस लाख गणेशभक्त या दिवशी रस्त्यावर उतरतात. तथापि या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा पध्दतीने एकत्र येणे हे मोठ्या संकटाला आमंत्रण देणे ठरेल. गेली पाच महिने पुणेकरांनी अतिशय जबाबदरीने या संकटात प्रशासनाला साथ दिली आहे. त्याबद्दल समस्त पुणेकरांचे जाहिर आभार मानतो आणि या गणेशोत्सवाच्या कालावधीतही आपण सर्व पुणेकर गर्दी टाळून या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य कराल याची खात्री बाळगतो,' असेही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.