अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर निर्मितीसाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीकडून 21 कोटी रूपयांची मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


कृपया प्रसिद्धीसाठी दि. 3 ऑगस्ट 2020


 श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य श्री गोविंददेव गिरी महाराज


यांची अयोध्या येथील पत्रकार परिषदेत घोषणा


पुणे, दिः3 ऑगस्टः भारताची आध्यात्मिक राजधानी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे निर्माण होणार्‍या प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र कार्यासाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे, महाराष्ट्रकडून कारसेवेच्या रूपात या पवित्र कामात योगदानासाठी 21 कोटी रूपयांच्या धनराशीची मदत करण्यात येईल. अशी घोषणा अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पूर्व संध्येला गणेश पूजन झाल्यानंतर आयोजित केल्या गेलेल्या एका पत्रकार परिषदेत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी आज केली. यावेळी श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महन्त नृत्यगोपालदासजी महाराज देखील उपस्थित होते.


माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे प्रमुख पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही राशी उभारण्यात येणार आहे.


 त्यासाठी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे, एमआयटी आर्ट, डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर,अंवंतिका विद्यापीठ, उज्जैन, मध्यप्रदेश, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हरसिटी, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह येथील सुमारे 75 हजार विद्यार्थी, 5 हजार शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून या पवित्र कामाच्या योगदानासाठी सुमारे 21 कोटी रूपयांच्या धनराशीची मदत करण्यात येईल.


अयोध्या येथे भगवान श्रीराम मंदिर निर्मितीमध्ये संस्थेचा हातभार लागावा म्हणून श्रीराम मंदिरातील सुंदर गर्भगृहाची निर्मिती शुभ्रधवल व सर्वोत्तम गुणवत्तेच्या मकराना संगमरवरामध्ये संस्थेतर्फे केली जाणार आहे. या भव्य गर्भगृहाचा आकार 30 फूट बाय 30 असा असेल. या गर्भगृहामध्ये 15 फूट उंचीचे 12 खांब असतील. जमीनपासून 27फूट उंचीचा सुवर्णजडीत ज्ञानज्योती रूप कळस उभारला जावा अशी संकल्पना देखील मांडण्यात आली आहे. यावरती 81 फूट उंचीचे संपूर्ण संगमरवरामध्ये शिखर बांधले जाईल ज्यावर विविध देव देवतांच्या सुंदर प्रतिमा कोरलेल्या असतील.


या भव्य गर्भगृहामध्ये प्रभू श्रीराम यांची साडे अकरा फूट उंच, अशी एकाच संगमरवराच्या दगडातून कोरलेली भव्य व सुंदर मूर्ती तसेच, श्री लक्ष्मण व माता सीता यांच्या सवा नऊ फूट उंचीच्या, एकाच संगमवरच्या मूर्ती देखील उभारण्यात येतील.


त्याचबरोबर, संपूर्ण जगासमोर भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मूर्तीमंत प्रतिक मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचे योग्य दर्शन घडावे यासाठी विश्वधर्मी श्रीराम भारतीय संस्कृती दर्शन ग्रंथालय यांची निर्मिती देखील करण्यात येईल.


आधी सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण सुंदर गर्भगृह आणि भव्य ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी सुमारे 21 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. या पवित्र कार्यासाठी संस्थेशी संलग्न असलेल्या विविध हितचिंतकाकडून योगदान देण्यात येईल. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे सदरील कार सेवा ही कार्य रूपाने करण्याची योजना आहे.


प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या सेवेसाठी केले जाणारे हे महान राष्ट्रधर्मपूजन, विश्वकल्याण आणि मानवकल्याणाचे कार्य तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने करण्याचे माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी सांगितले.


   जनसंपर्क अधिकारी,


माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे