मरण इतकं पोरकं आणि बेवारसही असू शकतं.?*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


.



🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️


 


*मरण इतकं पोरकं आणि बेवारसही असू शकतं.?*


 


 *कोरोनामुळे अनेक लोक या जगातून अगदी बेवारशाप्रमाणे गेले.! त्यांच्या पार्थिवावर डोकं ठेवून कोणीही निरोपाचा हंबरडा फोडला नाही... अखेरची सोबत देण्यासाठी जवळच्या चार लोकांचा खांदा त्यांना लाभला नाही... सदैव गर्दीत रमलेल्या काहींना शेवटचा निरोप द्यायला तर पोटची पोरंही येऊ शकली नाहीत... आयुष्यभर कर्मठपणे कर्मकांड कवटाळणाऱ्या अनेकांच्या तोंडात अखेरच्या क्षणी पाण्याचा एक घोटही विधिवत पडला नाही... कोणी पुढे न आल्याने स्थानिक यंत्रणेला त्यांची एखाद्या काळ्या कॅरीबॅगमध्ये परस्पर विल्हेवाट लावावी लागली... ज्यांच्या भाळी हे भयाण प्रारब्ध आलं असेल त्यांच्या प्रियजनांसाठी हे सारं अनुभवणं विलक्षण वेदनादायी असेल... कारण अशा पद्धतीने लोक शहरात कचरा फेकतात.!*


        *अमेरिका ही जगातली सर्वात शक्तीशाली महासत्ता.! या देशाकडे संपूर्ण पृथ्वी एकदा नव्हे किमान दहावेळा नष्ट करण्याची क्षमता असलेली हजारो अण्वस्त्रे आहेत... मात्र, आज कोरोना लाखो अमेरिकन मारत असताना या महासंहारक अस्त्रांचा काहीही उपयोग झालेला नाही... एका न दिसणाऱ्या विषाणूने जणू या महासत्तेचा दारुण पराभव केलाय.! भविष्यात कोणतीही महासत्ता ही माणसं मारण्याच्या क्षमतेवरुन ठरवली जाणार नाही, तर ती माणसं जगवण्याच्या क्षमतेवर ठरवली जाईल... त्यासाठी माणूस मारण्याऐवजी माणूस जगवण्याचाच विचार करावा लागेल... हा इतका उदात्त विचार करायला भाग पाडले ते एका सूक्ष्म अशा विषाणूने.!*


       *कोरोनामुळे घायाळ झालेल्या जगाची हानी केवळ लाखो मृत्यू आणि करोडो बाधित इतकी जैविक नाही... त्याशिवाय कोरोनाने संपूर्ण जगभरात घडवलेला उत्पात फार मोठा आहे... या नुकसानीची पैशात मोजदाद करणे अशक्य आहे... अगदी अंदाजाने करायचीच झाली तर ती होते दहा ट्रिलिअन डॉलर्स.! (भारतीय अर्थव्यवस्था फक्त २.८ ट्रिलिअनची आहे.!) एका अदृश्य विषाणूमुळे साऱ्या जगाचं शटर दीर्घकाळासाठी खाली खेचावं लागलंय.! अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळत आहेत... अनेक उद्योगांची चाके कायमस्वरूपी थांबलीत... शाळांना कुलुपं लागलीत... सारं समाजजीवन ठप्प झालंय.! पुढच्या काळात तर काही देशात कोरोनाच्या मुद्द्यावरून सरकारे गडगडतील... जगण्याचं प्रत्येक क्षेत्र उद्ध्वस्त झालं आहे... 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है!' असा फिलॉसॉफिकल डायलॉग कधीतरी ऐकला होता... मात्र, एक अदृश्य व्हायरस आलम दुनियेची सर्वार्थाने कशी वाट लावू शकतो ते आता आम्ही अनुभवतोय.!*


       *यंदाचं वर्ष म्हणजे जणू सध्याच्या गतिमान आयुष्याच्या पॉवर प्लेमध्ये मेडन गेलेली ओव्हर.! या वर्षात आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या भरीव असं काहीही करता येऊ शकणार नाही... जगात सध्या सर्वाधिक तरूण लोकसंख्या भारताची आहे... आणि अवघे २९ वर्षे सरासरी वय असणाऱ्या तरुण देशासाठी असं एखादं वर्ष निष्क्रिय जाणं हे प्रचंड मोठे नुकसान आहे... आमच्या आयुष्याचा हिशेब मांडताना खरं तर चित्रगुप्ताने हे वर्ष मोजूच नये.!*


       *कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यात सरकार फेल गेलेलं नाही... फेल गेले आहेत ते नागरिक.! लोकांना जगवणं ही सरकारची जेवढी जबाबदारी आहे, त्यापेक्षा ती जास्त आपली स्वतःची आहे... इथे तसं होत नाही... सामूहिक शहाणपण दर्शवणारे समाजभान आपल्याकडे नाही... लोकांच्या ढुंगणावर काठ्या मारुन सांगावं लागतं, बाबांनो घरी बसा... मास्क नाही लावला तर दंड होईल... सरकार नियम आणि कायदे करु शकते पण त्याचे पालन करण्याची मानसिकता लोकांमध्ये असावी लागते... अन्यथा कितीही कठोर कायदा केला तरी लोक तो मोडू शकतात... अगदी हत्तीच्या पायी दिले जाईल अशी घोषणा जरी केली तरी इथले लोक हत्ती कसा आहे हे बघायला बाहेर पडतील.!*


       *केवळ महाराष्ट्रात किती पोलिसांना कोरोना झालाय माहितीये.? सहा हजारांहून अधिक.! आपल्या सामाजिक जीवनात स्वयंशिस्तीचा प्रचंड अभाव आहे... इंग्रजांच्या शिस्तप्रियतेबद्दल पुलं म्हणत, जिथे दोन इंग्रज माणसे एकत्र येतात तिथे रांग तयार होते... आपल्याकडे दोन माणसे एकत्र आल्यावर एक पोलिसदादा उभा करावा लागतो... सध्या पोलिसांना लढावं लागतंय लोकांची बेशिस्त आणि उडाणटप्पूपणाशी.! अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले नसतील तेवढे पोलीस या आपत्तीत गेलेत... त्यांना कोरोनाने नाही येथील हौशानवशांच्या बेशिस्तीने मारले.!*


       *लॉकडाऊनबाबत देशातील सरकारांची अवस्था एखाद्या कातावलेल्या बापासारखी झाली आहे... घरात कोंडलेली पोरं वैतागलीत आणि ती सोडायची म्हटली तर बाहेर कोरोना एखाद्या जहरी नागासारखा फणा काढून डंख मारायची वाट पाहतोय.! ज्यांनी घरात थांबायला हवे ते बाहेर निघतात आणि ज्यांनी बाहेर निघायला हवे ते घरातच थांबतात... इथल्या सज्जनांची विधायकता निष्क्रिय आहे तर दुर्जनांची विघातकता सक्रिय.! कोरोनाकाळात फिजिकली चोऱ्या-घरफोड्या बंद झाल्यानंतर चोरांनी 'वर्क फ्रॉम होम' चे डिजिटल निष्ठेने पालन केले... त्यांनी भर दिला तो सायबर क्राईमवर.!*


        *होय, हे सारे केवळ देशद्रोहीच नव्हे मानवद्रोही सुद्धा.! अशा भीषण आपत्तीच्या काळात अडलेल्यांची लूटमार करणारे, बेशिस्त वागणारे, कायदे मोडणारे, लोकांना वेठीस धरणारे, कामचुकारपणा करणारे, मदतकार्यात फ्रॉड करणारे हे सारे देशद्रोहीच.! गलवानमध्ये घुसलेले सीमेपलिकडचे चिनी घुसखोर आणि सीमेअलिकडचे हे हरामखोर दोन्हीही सारखेच अमानूष.!*


       *'हात स्वच्छ धुवा' असं आई लहानपणी आपल्याला नेहमीच सांगायची... आता तेच देशाच्या प्रधानमंत्र्यांना आपल्याला मोठेपणी सांगावे लागले.! देशाला भेडसावणाऱ्या आणि दरवर्षी लाखोंचे बळी घेणारे सतरा प्रमुख आजार रोखण्याचा एकमेव उपाय आहे, हात स्वच्छ धुणे.! काही प्राथमिक संस्कारांची आधुनिक काळातील तीव्र गरजच जणू नियतीने अधोरेखित केली आहे... प्रधानमंत्र्यांनी सांगितलं म्हणून आपण मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवू शकतो... दिवे लावू शकतो... परंतु, त्यांनीच केलेल्या कळकळीच्या आवाहनानुसार आपण सार्वजनिक शिस्त पाळू शकत नाही... कारण आपल्याला उत्सवी उन्माद आवडतो... उथळ कर्मकांड आवडतं.! संकटकाळातही आपण गांभीर्याने वागू शकत नाही... भीषण आपत्तीच्या काळात गरजूंना मदत करणे हा सोहळा कसा ठरू शकतो.?*


       *समाजातील विचारी समूहाचा मृत्यू ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे... कोणत्याही समाजात शहाणी आणि विवेकी माणसे ही मूठभरच असतात आणि एकूण समाजाला शहाणपण लाभतं ते त्यांच्यामुळेच.! समाजात अधिकारवाणीने सांगू शकणारी अशी ठिकठिकाणची 'चार माणसे' आपण वेगवेगळ्या पातळ्यांवर ट्रोल करुन संपवली... त्यामुळे आता आपणास कोणाचाही धाक राहिलेला नाही... सध्या सोशल मीडियाच्या अतिरेकातून पोसलेल्या अक्कलशून्य नादानांच्या झुंडी कोणत्याही शहाण्या माणसाचा आवाज बंद करु शकतात... अशा समाजाचे भविष्य काय असणार.? असा समाज झुंडीने जगतो आणि झुंडीनेच मरतो.!*


       *अनुभव हा सर्वात श्रेष्ठ गुरु आहे हो, फक्त तो किंमत खूप मोजतो... काही लाख जीवांची किंमत मोजून आणि साऱ्या जगाचं जनजीवन उद्ध्वस्त होऊनही आपल्याला यातून काही शहाणपण येणार नसेल तर आपल्या नशिबी यापेक्षा अधिक भीषण आणि बेवारस मरण लिहिलं असावं.!*


🦊🦊🦊🦊🦊🦊🦊🦊🦊🦊🦊