पुणे प्रवाह न्युज पोर्टल
....
जाळी लावून दिवसा आणि रात्री देखील प्राणी मारणारे यांची वर्दळ
कर्जत,ता.24 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगररांगेत आणि आसपासच्या जंगलात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या शिकारी होत आहेत.तेथे दिवसा आणि रात्री देखील प्राणी जाळ्यात अडकवून मारणारे जाळी घेऊन फिरताना दिसत आहेत.दरम्यान,माथेरान आणि परिसरातील जंगल हे संरक्षित वन असून या जंगलात कोणत्याही प्राण्यांना मारण्यास बंदी आहे,असे असताना दररोज प्राणी आणि पशु मारले जात असून त्यांना वन विभागाचे भय नाही काय?असा प्रश्न उभा राहत आहे.
माथेरानचा डोंगर हा बेडीसगाव पर्यंत ठाणे जिल्हा हद्दीत पोहचला असून कर्जत कडे किरवली पर्यंत आणि मागे पनवेल तालुका हद्दीत देखील या जंगलाचे अस्तित्व आहे.या जंगलात मोठ्या प्रमाणात गर्द वनराई असल्याने प्राण्यांचा आणि पशूंच्या वावर देखील मोठ्या प्रमाणात असतो.त्यात माथेरान आणि परिसरातील जंगल हे सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशाने पर्यावरण दृष्ट्या संरक्षित वन म्हणजे इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.अशावेळी त्या संरक्षित जंगलात प्राण्यांचा मुक्त वावर असतो,काही अति महत्त्वाचे प्राणी अनेकदा दृष्टीस देखील पडतात.ही बाब लक्षात घेता लॉक डाऊन झाल्यापासून अनेकांचे रोजगार बंद आहेत.त्यामुळे रोजगार हिरावला गेल्याने काही लोक प्राण्यांची शिकार करण्याचे काम नित्यनेमाने करीत असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे रिकामटेकडे उद्योग म्हणून देखील प्राण्यांची शिकार आणि पशु-पक्षी यांना मारण्यासाठी धुंडीच्या धुंडी बाहेर पडत आहेत.त्यात माथेरानच्या जंगलात अनेक भागात वाहने जात नाहीत,आणि त्यातही वन विभागाच्या नियमाप्रमाणे माथेरान मध्ये वाहनांना बंदी आहे.हे पाहता वन विभागाचे मोजके कर्मचारी कुठे कुठे फिरणार?आणि याच संधीचा फायदा घेऊन माथेरानच्या जंगलात आणि आजूबाजूच्या जंगलात सध्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार केली जात आहे.
लॉक डाऊन सुरू झाल्यापासून माथेरान मध्ये थांबलेले जनजीवन लक्षात घेऊन आणि बाहेर कोणीही पडत नसल्याने त्याचा फायदा काही लोक घेत आहेत.मोठ्या प्रमाणात प्राण्यांची शिकार करण्यासाठी लोक दस्तुरी परिसर ते कड्यावरचा गणपती ह्या भागात किमान 15 ते 20 जणांचा टोळक्यांनी येत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे.त्याचवेळी रेल्वेच्या बाजूला जाळे लावून शिकार येण्याची वाट बघत राहण्याचे प्रकार घडत आहेत.त्यात प्राणी कोणत्या भागात आहेत,त्याची टेहळणी देखील केली जात असून टेहळणी करणारे आपल्या अन्य साथीदारांना त्याबाबत माहिती देत असतात.कधी जाळी लावून तर कधी आरडाओरडा करून प्राण्यांना पळविण्याचे प्रकार केले जात आहेत.भेकड,ससे,अस्वल,रान डुक्कर अशा प्राण्यांची शिकार केली जात असल्याचे बोलले जात आहे.एप्रिल 2020 पासून जुलै महिना संपत आला तरी प्राण्यांची शिकार करण्याचे सुरूच आहे.ही बाब लक्षात घेता वनविभागाने या प्राणी शिकार प्रकरणी मोहीम हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.माथेरान आणि परिसरातील संरक्षित वनांमध्ये सुरू असलेली बेकायदेशीर शिकारी थांबविण्यासाठी वन विभागाने कडक पावले उचलण्याची गरज आहे.मात्र वन विभाग पावले उचलत नसल्याने माथेरानच्या जंगलातील प्राण्यांची संख्या कमी झालेली असून येथील प्राणी संपुष्टात आल्यास त्यावेळी माथेरान हे भकास होण्यास वेळ लागणार नाही.त्याचवेळी रात्री बारा वाजेपर्यंत माथेरान जंगलात बॅटरीचा प्रकाश दिसून येत असतो
नारायण राठोड-वनक्षेत्रपाल नेरळ माथेरान
आम्हाला कोणत्या भागात जाळी लावून किंवा अन्य साहित्य वापरून प्राण्यांची शिकार केली जात आहे हे कळवावे.आम्ही त्या शिकाऱ्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू.मात्र आम्ही देखील जंगलात गस्त घालत असतो,अशावेळी कोणी आम्हाला संशयित पणे फिरताना दिसले तरी आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.
फोटो ओळ
माथेरान जंगलात लावलेले जाळे
छायाः गणेश पवार