पुणे प्रवाह न्युज पोर्टल
नेरळ ग्रामपंचायत प्रकरणात आदिवासी संघटना आक्रमक, आदिवासी सरपंचाला त्रास व दबावतंत्र वापरून अपमानित करणार्यांना अटक करण्याची मागणी
कर्जत दि.12 गणेश पवार
नेरळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रावजी शिंगवा हे अनुसूचित जमाती आहेत हे माहित असूनही त्यांना त्रास देऊन दबावतंत्र वापरून जातीवाचक बोलून अपमानित व बदनामी केल्याने नेरळ येथील दोघांवर ऍकॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आदिवासी बांधवाला दबाव टाकण्यासाठी केलेल्या या कृत्याचा आदिवासी संघटनेने आक्रमक होत निषेध व्यक्त करून या वृत्तीचे समूळ उच्चटन करण्यासाठी यातील आरोपीना अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली केली आहे. या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत याना देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी व आर्थिक उलाढाल असलेली नेरळ ग्रामपंचायत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक देखील प्रतिष्ठेची समजली जाते. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत येथील थेट सरपंच पद हे अनुसूचित जमाती साठी आरक्षित ठेवण्यात आले होते. तेव्हा झालेल्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचे अनुसुचित जमातीचे उमेदवार रावजी शिंगवा यांनी बाजी मारली होती. गेले सहा महिने ते ग्रामपंचायतीचा कारभार हा सहकारी सदस्य यांच्यासोबत करत आहेत. मात्र दिनांक 5 जुलै रोजी विद्यमान सरपंच रावजी शिंगवा हे नेरळ आंबेवाडीफाट्या जवळ उभे असताना माजी सदस्य व उपसरपंच केतन पोतदार हे त्यांच्याजवळ आले. व आपल्या सांगण्याप्रमाणे शिंगवा हे ऐकत नाही याचा राग मनात धरून शिंगवा यांना जातीवाचक शब्द उच्चारून त्यांचा अपमान केला. तर दुसरीकडे रस्ता चोरी प्रकरणात ज्यांच्या घरापासून रस्ता मंजूर होता त्या अजित सावंत यांनी शिंगवा यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून एकही आरोप सिद्ध नसताना बदनामीकारक वाक्य असलेले नेरळ शिवसेनेच्या बुरुजाजवळ भ्रष्टाचार करो "ना" अश्या मथल्याचे पत्र लिहून ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. गेले अनेक दिवस ग्रामपंचायतीत देखील शिंगवा यांचा छळवाद होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे त्रास देऊन बदनामी करून आपल्यावर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्यात माजी उपसरपंच, सदस्य केतन पोतदार व माजी शहरप्रमुख अजित सावंत यांच्यावर भा.दं.वि.क. 500, 506, अनुसुचीत जाती/जमाती अधिनियम, 1989 (3)1, r,s,u प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात आदिवासी समाजाचे असलेले शिंगवा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आदिवासी संघटना देखील आक्रमक झाली आहे. नेरळचे प्रथम नागरिक असलेले रावजी शिंगवा यांना सरपंच पदावर बसल्यापासून मानसिक त्रास देण्याची मालिका सुरु झाली आहे. या ना त्या प्रकारे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. तेव्हा या प्रकरणात त्यांच्यावर झालेल्या जातीवाचक व अपमानास्पद वागणुकीबद्दल कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी तात्काळ दखल घेत दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आरोपीना तात्काळ अटक करून त्यांना कठोर करण्याची मागणी आदिवासी ठाकूर कातकरी विकास संघटनेने केली आहे. तसे निवेदन देखील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यलयात सादर केले आहे. आदिवासी समाजाला सरकारने अनुसूचित जाती, जमाती अधिनियमानवये संरक्षण दिले आहे. मात्र तरीही या कायद्यांची भीडभाड न ठेवता आदिवासी समाजाच्या सरपंचाला मानसिक त्रास देऊन त्याच्यावर दबावतंत्राचा वापर केला जातो. तर पदसिद्ध लोकप्रतिनिधींचा एकेरी उल्लेख करून सिद्ध न झालेले आरोप करून जहाल शब्दात त्याच्यावर लिखाण करून ते व्हायरल केले जाते अश्या वृत्तीचे वेळीच खंडन केले पाहिजे त्या करीता अशा आरोपींवरती कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्याकरिता आदिवासी संघटना रस्त्यावर उतरण्यासाठी देखील मागेपुढे पाहणार नाही असा इशारा यावेळी वृत्त प्रतिनिधींशी बोलताना संघटनेचे तालुकाध्यक्ष भरत शीद यांनी दिला आहे.