सामान्यातील असामान्यत्व :दीपा परब

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


दीपा आणि दीपक परब हे पतीपत्नी आणि प्रीतम आणि तनिष ही त्यांची दोन मुलं असं एक छोटंसं चौकोनी कुटुंब ! दीपाशी माझी ओळख साधारण 12 वर्षांपूर्वी एक पेशंट म्हणून झाली .पुण्यात धनकवडी येथे माझ्या पुरोहित हॉस्पिटलच्या 4 इमारती पलीकडेच ती राहते पण तिची खरी ओळख आत्ता झाली जेव्हा करोनाच्या साथीत महाराष्ट्र आणि विशेषत्वाने पुण्यात मोठ्या प्रमाणात करोना चे रुग्ण वाढू लागले.परिस्तिथीचे गांभीर्य पाहून स्वयंस्फूर्ती ने दीपा विविध सोसायटीमध्ये जाऊन सोडियम ह्यापोक्लोराईट ची फवारणी करायला आमच्या परिसरात येऊन पोचली . रुग्ण सापडल्या नंतर औषध फवारणी करण्यापेक्षा आधीच केली तर रुग्णसंख्या मर्यादित राहायला मदत होईल असा विचार करून दीपाने निर्धाराने कामाला सुरुवात केली. फवारणीचे यंत्र जे फक्त उचलणे देखील जड असते ते 3 -3तास आपल्या पाठीला लावून दीपा स्वतः दररोज वेगवेगळ्या भागात ही फवारणी मोफत करते आहे .इतका वेळ हे मशीन पाठीला लावून तुला त्रास नाही का होत ? मी विचारलं तेंव्हा जेजुरीतआई बरोबर शेतात उसाच्या फवारणीचे काम केल्याचा फायदा झाला असे ती हसत हसत म्हणाली . ती आम्हाला भेटली तेंव्हा स्वतः च्या सुरक्षेसाठी मास्क आणि ग्लोव्हज शिवाय कोणतीच काळजी तिने घेतली नव्हती.मग आम्ही तिला PPE कीट भेट दिले आणि ते कसे वापरायचे ते तिला समजावले. तिला खूप समाधान वाटले .लॉकडाऊन म्हणून फक्त घरात बसून न राहता आत्ता मी माझ्या आजूबाजूच्या समाजासाठी काय करू शकते याचा विचार करून दीपा स्वतःची पर्वा न करता घराबाहेर पडली .संपूर्ण पुण्यातून आज अनेक ठिकाणाहून तिला फवारणी साठी बोलावणे येत आहे. असं म्हणतात “ इरादे मजबूत हो तो सारी कायनात उसे पुरा करने मे लग जाती है “ त्या प्रमाणे पोलीस ,महानगर पालिका अधिकारी, नगरसेवक आणि अर्थात तिच्या रणरागिणी तिच्या मदतीला धावून आले . दीपा सोसायटीत मोफत फवारणी करते ही माहिती पाहता पाहता लोकांत पसरली .करोना ची भीती वाटत असली तरी उपाय काय ? याचे उत्तर कळत नसलेल्या लोकांना या कामामुळे धीर आला . लोक आपणहोऊन तिला आपल्या सोसायटीत बोलावू लागले आणि मोबदला घेण्याचा आग्रहही करु लागले तेव्हा तिने त्यांच्याकडे रोख रक्कम न घेता धान्य मागितले ,तेल, साखर मागितले ,गॅस सिलिंडर मागितला आणि सुरू झाला पुढचा प्रकल्प गरीब आणि उपाशी पोटासाठी अन्नदान करण्याचा ! दीपाची मुले आईवडिलांचे समाजासाठी झटण्याचे संस्कार घेतच मोठी होत आहेत . दीपा फवारणी संपवून 1वाजेपर्यंत घरी येते तोपर्यंत तिची मुले , वय वर्षे 17 आणि 12 भाज्या वगॆरे चिरून स्वयंपाकाची सर्व तयारी करून ठेवतात. दीपा आल्यावर भाजी करते. शेजारच्या बायका पोळ्या लाटायला मदतीला येतात .मोबदल्यात दीपा त्यांना तेलाची पिशवी देते .त्यापण मग आनंदाने काम करतात . कात्रज पासून स्वारगेट पर्यंत गरजू ,भुकेल्या लोकांना मोफत जेवण पोचवण्यासाठी दीपा आपल्या गाडीला किक मारते.रोज तीनचारशे लोकांचा स्वयंपाक ती करते आणि गरजूंपर्यंत पोचवते देखील !हे काम लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अखंड अव्याहत चालू आहे गेले अडीच महिने ;ना दीपा दमली ना मदतीचा ओघ मंदावला ना गरजूंची रीघ कमी झाली ! या कामाबद्दल मी तर दीपाला मनापासून सलाम करते.समाजसेवा तिच्या रक्तात आहे की एक उत्तम माणुस म्हणून आजूबाजूच्या सामाजिक परिस्थिती ची बोच ही थेट तिच्या हृदयापर्यंत पोचली आणि ती ठिणगी मशाल बनली ? एक डॉक्टर म्हणून ,एक स्त्री म्हणून मला तिने तिच्या शक्ती नुसार समाजाच्या स्वीकारलेल्या या मातृत्वाचा खूप अभिमान वाटला.तिची गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन यावे असे वाटले . 


 आजची ही ‘रणरागिणी दीपा ’ कशी घडत गेली ? तर दीपा चार बहिणी आणि एक भाऊ या भावंडांपैकी चौथी मुलगी ! साहजिकच मुलींच्या शिक्षणाकडे आई वडिलांनी दुर्लक्षच केलं . पण तरीही घरची बेताची आर्थिक परिस्थिती, कमावणारे एकटे वडील त्यामुळे दीपा जिद्दीने रद्दी विकणे, कागदाच्या पिशव्या बनविणे यासारखी विविध कामे करून घरखर्चाला हातभार लावत होती .अचानक वडील कॅन्सर ने आजारी पडले तेंव्हा सर्वात धाकटी असूनही मोठ्या बहिणींच्या लग्नासाठी सारसबागेत वडापाव विकून तिने पैसे उभे केले . खरतर पोलिसात जाण्याची दीपाची खूप इच्छा होती पण आपल्या घरच्या मुली पोलिसात काम करत नाहीत म्हणून आईने भरलेला फॉर्म फाडून टाकला आणि दीपाची स्वप्नांवर पाणी पडले. तोपर्यंत दीपक सारखा तिच्या स्वप्नांना बळ देणारा मित्र तिला भेटला होता . आता काय करायचं तर विविध क्षेत्रातील वस्तूंच्या होम टू होम मार्केटिंग च्या कामात दीपाने हळूहळू जम बसवला . हे काम करताना अनेक स्त्रियांशी तिचा संपर्क येवू लागला . इतकेच नाही तर गरजू ,अत्याचारित बायका तिच्याकडे मदत मागायला येऊ लागल्या . अनेकजनींना दीपा ने स्वतःच्या पायावर उभे केले . काहींना ड्रायव्हिंग शिकवून ,काहींना मार्केटिंग शिकवून आणि ज्या इच्छुक होत्या आणि शरीराने तंदुरुस्त होत्या त्यांना लेडी बोउन्सर चे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवले . 12 प्रकारच्या विविध मार्केटींग क्षेत्रात दीपाचा आता अनुभव होता तिथे काम करत तिने जवळ जवळ 1500 स्त्रियांना काम मिळवून दिले ,त्यांचे संसार उभे केले आणि त्यांना कायमचे आपलेसे केले . मग पुढे दीपा मेकअप आर्टिस्ट म्हणून मराठी फिल्म इंडस्ट्रीत घुसली . विविध कलाकार ,तंत्रज्ञ यांच्याशी संपर्क येऊ लागला आणि एक दिवस दीपा ला तिच्या रफ टफ पर्सनॅलिटी मुळे ‘ इंदू सरकर ’ या सिनेमात चक्क पोलिसाची भूमिका करायला मिळाली आणि तिचं पोलीस होण्याचं स्वप्न एकप्रकारे पूर्ण झालं . पण तेव्हढ्यावर दिपा कुठली स्वस्थ बसणार ?


 दीपाला आता दीपक च्या रूपाने आयुष्याचा साथीदार मिळाला . दीपक चणीने लहानखुरा पण उत्तम खेळाडू आहे.दीपक ची स्वतःची “पूना स्पोर्ट्स परब अकॅडमी “ आहे . नेहरू स्टेडियम येथे त्याच्या मार्गदर्शना खाली अनेक मुलांनी आपापले क्रिकेट करिअर घडवले . दीपा देखील हे प्रशिक्षण घेऊन त्याच्या बरोबर कोच म्हणून मैदानावर उतरली . रनिंग ,सायकलिंग ,गोळाफेक या सारख्या अनेक शारीरिक प्रशिक्षणात मूला मुलींना तयार करण्यात दीपक ला मदत करत होती .पोलीस होण्याचं तिचं स्वप्न कदाचित ती त्यांच्यात पाहत होती . सध्या ती पोतदार हायस्कूल मध्ये क्रिकेट कोचिंग घेते . नवऱ्याच्या खंबीर पाठिंब्याने एकीकडे दीपा ने बी ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले .


फिल्मी क्षेत्रात काम करताना अनेक कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेसाठी बाऊन्सर्स लागतात हे ती पाहत होती. पण त्या क्षेत्रात कुठेही महिला दिसत नाहीत .पण योगायोगाने एकदा दीपा ला अशा कामाची संधी मिळाली पण हे महिलांचे काम नाही असं म्हणून तिला डावलले गेले .स्त्रिया करू शकत नाहीत असे कोणते काम असूच शकत नाही हा तिच्यातील आत्मविश्वास उफाळून आला . या घटनेने दीपाच्या डोक्यातील पोलिसात जाण्याच्या इच्छेने परत एकदा डोके वर काढले . पोलिसात जाता आले नाही तरी लेडी बाउन्सर म्हणून आपण तेच काम स्वतंत्रपणे करू शकतो . अनेक क्षेत्रातील स्त्रियांची मोठी संपर्क यादी दीपाकडे तयारच होती . दीपाच्या या कल्पनेला तिच्याच आत्मविश्वासाने खतपाणी घातले आणि नवरा दिपक चा भक्कम पाठिंबा यातून “ रणरागिणी वुमन पॉवर बिझिनेस ऑर्गनायझेशन “ ही संस्था उभी राहिली.उत्तम शारीरिक शिक्षणातून स्वसंरक्षण आणि पोलिसांच्या मदतीसाठी समाजात शिस्त आणि संरक्षण देण्यासाठी स्त्रियांची समांतर पलटणच दीपा ने उभी केली .आज या संस्थेत साधारण 500 रणरागिणी रजिस्टर्ड आहेत आणि दररोज सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढतच आहे . मी एकटी काय करू शकणार असा नुसता विचार करून काहीच न करण्यापेक्षा दीपा ने छोटीशी मशाल घेऊन धावायला सुरुवात केली आणि पाहता पाहता कारवा बनता ही चला गया ! आज वुमन इम्पोवरमेन्ट क्षेत्रातील 102 पुरस्कारांनी दीपाला सन्मानित केलं गेलं आहे . पंजाब पासून कर्नाटक पर्यंत अनेक स्त्रिया मदतीसाठी तिला संपर्क करतात . आत्तापर्यंत अनेक वृत्तपत्रात , एकूण 28 चॅनेलवर तिच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्या अगदी शेजारी राहणारी’ ही’ दीपा परब मला मात्र माहीत नव्हती .आज खऱ्या अर्थाने माझा तिच्याशी परीचय झाला . पती दीपक यांना दीपाच्या कामाचा सार्थ अभिमान वाटतो यातच दीपाच्या कामाचे खरे यश आहे . त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच दीपा हा खडतर मार्ग सहज चालते आहे .सामान्यातूनही असामान्यत्व कसं निर्माण होऊ शकतं हे दीपाच्या उदाहरणातून दिसतं .रात्रीच्या2/3 वाजता जरी मदतीसाठी फोन वाजला की लगेच ही रणरागिणी निघते! “जिथे कमी तिथे आम्ही “ ह्या ब्रीदा ला वाहून घेतलेली ही स्त्री शक्ती 👍


         -डॉ . गीतांजली पुरोहित


Popular posts
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
दापोडी आणि बोपोडी ला जोडणाऱ्या हँरीस ब्रीज नदी पात्रातील कचरा राडा रोडा याची पाहाणी मा.महापौर मुरलीधर मोहळ आयुक्त मा.शेखर गायकवाड़ यांनी पाहाणी केली*
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली