आंतरराष्ट्रीय डिझाईन स्पर्धेत एमआयटी एडीटी विद्यापीठाची  श्रेया बन्सल हिच्या डिझाईनला जगात सहावा क्रमांक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुणे, ता. 08 :- द वाईल्ड या आंतरराष्ट्रीय कंपनीतर्फे डिझाईनच्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्चूअल रिऍलिटी अँड ऑगमेंटेड रिऍलिटी या विषयावर नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑनलाईन डिझाईन स्पर्धा घेण्यात आली होती. यात जगभरातून जवळपास दहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरच्या इंस्टीट्यूट ऑफ डिझाईनमध्ये इमर्सिव मीडिया डिझाइन या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत असलेली श्रेया बन्सल हिने बनवलेल्या ''इंटर कनेक्टेड कॅफे'' या डिझाईनला सहावा क्रमांक मिळाला. श्रेया हिने तयार केलेल्या ''इंटर कनेक्टेड कॅफे'' या डिझाइनमुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळच्या कॅफेमध्ये बसून दुसर्‍या शहर, राज्य किंवा अगदी एखाद्या देशातील मित्र आणि कुटूंबासह कॉफी किंवा जेवणही घेता येईल. या डिझाईनमध्ये प्रत्येक टेबलवर होलोग्राफिक डिव्हाइस लावण्यात आलेले आहे. या डिव्हाइसचा उपयोग करून ग्राहकांना मेनू पाहूण जेवणाची ऑर्डर, बिल भरणा, व्हिडीओ कॉल, नवीन लोकांशी संपर्क, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभाग आणि थेट संगीत ही ऐकू शकता येणार आहे. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एक संपूर्ण नवीन कार्य संस्कृती विकसित करता येईल. अशा प्रकारच्या कॅफेचा उपयोग व्यवसाय मिटिंग, ग्राहकांचे पुनरावलोकन, मुलाखती आणि बर्‍याच गोष्टींसाठी केला जाईल, असे श्रेया हिने सांगितले. श्रेया हिच्या या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलसचिव शिवशरण माळी, एमआयटी इंस्टीट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता डॉ. अनंत चक्रदेव आणि प्रा. ललित कुमार यांनी अभिनंदन केले.  


------------------