दगडूशेठ दत्तमंदिरा' च्यावतीने 'गुरुरुपी जीवरक्षकांना' अभिवादन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


-


 


कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने २० बाय १५ च्या अभिवादन फलकाचे अनावरण : विद्यार्थी भोजन सहाय्य योजनेची शताब्दी 


 


पुणे : कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे लॉकडाऊनच्या काळात अहोरात्र काम करणा-या गुरुरुपी जीवरक्षकांना अभिवादन करण्यात आले. दरवर्षी याच दिवशी गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे स्वरुप जरी बदलले असले, तरी त्यानिमित्त २० बाय १५ या आकारातील फलकाच्या माध्यमातून या जीवरक्षकांना अभिवादन करण्यात आले. धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांच्या हस्ते फलकाचे अनावरण झाले. 


 


दत्तमंदिरात धर्मादाय सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, राहुल चव्हाण, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई, गुडविल इंडिया उपक्रमाचे कालिदास मोरे, सुनंदा आल्हाटे व सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, संदीप लचके, विजय पाचंगे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते आरती करण्यात आली.


 


लॉकडाऊनच्या काळात बाहेरील गावांतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातर्फे मार्च महिन्यामध्ये भोजन सहाय्य योजना सुरु करण्यात आली होती. तब्बल १०० दिवस ही भोजन सेवा अखंडपणे सुरु होती. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आज पुरणपोळीचे भोजन देखील देण्यात आले. 


 


अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात या दिवशी होते. यंदा कोणतेही इतर कार्यक्रम होणार नाहीत. परंतु कोरोना विरोधातील लढाईत लढणारे पोलीस, परिचारीका, डॉक्टर, स्वयंसेवक अशा सर्व जीवरक्षकांना अभिवादन करण्यात येत आहे. पुणे शहरातील अभ्यासिकांमध्ये असलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांना निर्बधांमुळे खानावळी बंद झाल्याने ट्रस्टतर्फे दुपारचे जेवण पार्सल स्वरूपात देण्यात येत होते. या उपक्रमाला १०० दिवस पूर्ण झाले. त्याबद्दल धर्मादाय आयुक्तांनी देखील ट्रस्टचे अभिनंदन केले.


 


*फोटो ओळ : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे सुरु असलेल्या भोजन सहाय्य योजनेच्या शताब्दी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे जेवण देण्यात आले. तसेच गुरुपौर्णिमा उत्सव प्रारंभानिमित्त सर्व क्षेत्रात काम करणा-या गुरुरुपी जीवरक्षकांना २० बाय १५ च्या फलकाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. आरती करताना मान्यवर.