पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*
*पुणे, दि. 05 जून 2020 :* मावळ, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात महावितरणची जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा पुन्हा उभारण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून पावसामुळे निसरडा झालेला डोंगराळ भाग, चिखल, शेकडो पडलेली झाडे, फांद्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे 200 अभियंता व 1250 कर्मचारी रात्रंदिवस वीजयंत्रणेची दुरुस्ती करीत आहे.
दरम्यान, ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर मावळ, जुन्नर, खेड व आंबेगाव तालुक्यातील बंद पडलेले 33/11 केव्ही क्षमतेचे सर्वच 47 उपकेंद्र गेल्या 24 तासांमध्ये सुरु करण्यात यश आले आहे. या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या 309 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जुन्नर व मावळ भागातील अतिदुर्गम व मोठ्या प्रमाणावर हानी झालेल्या 78 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याने तसेच दुर्गम भाग असल्याने दुरुस्ती कामांना वेळ लागत आहे.
पुणे ग्रामीण मंडलमधील मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव या चार तालुक्यांमध्ये वीजयंत्रणेच्या उभारणीसाठी महावितरणचे 200 अभियंते व 800 जनमित्र तसेच कंत्राटदारांचे 450 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रादेशिक संचालक (प्र) श्री. अंकुश नाळे यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन वीजयंत्रणेच्या दुरुस्तीची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह महावितरणचे अभियंते व कर्मचारी मावळ, जुन्नर तालुक्यांमध्ये बंद असलेली वीजयंत्रणा पुन्हा उभारणीसाठी रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत आहेत. येत्या 24 तासांमध्ये दुर्गम व अतिदुर्गम भागातील बंद असलेली उर्वरित वीजयंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
पुणे शहरामध्ये कोंढवा परिसरात एक रोहित्र, वाकड व हिंजवडी परिसरातील तीन रोहित्रांचा तसेच भोसरीमधील एस ब्लॉकमधील दोन रोहित्रांचा वीजपुरवठा आज रात्रीपर्यंत सुरु करण्यात येत आहे. वीजवाहिन्यांवर झाडे व फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्यामुळे विलंब होत होता. मात्र दुरुस्ती पूर्णत्वाकडे आहे. ही सहा रोहित्र वगळता पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच भागात वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सद्यस्थितीत सर्व्हिस लाईनवर फांद्या पडल्यामुळे त्या तुटल्याने किंवा वादळा दरम्यान इतर कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या वीजग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम वेगाने सुरु आहे.
------
*सोबत फोटो*- मावळ व जुन्नर तालुक्यातील वीजयंत्रणेचे व दुरुस्ती कामाचे फोटो
---------------------------------
*कृती आराखड्यानुसार महावितरणच्या वीजयंत्रणेची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरु*
_*प्रादेशिक संचालक श्री. नाळे यांची माहिती*_
*पुणे, दि. 05 जून 2020 :* ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 2650 वीजखांब नादुरुस्त झाले आहेत. ही वीजयंत्रणा पुन्हा उभारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दुरुस्ती कामांसाठी विविध योजनेतील कंत्राटदारांचे सहाय्य घेतले जात असून महावितरणचे इतर भागातील अभियंते व कर्मचारी यांना प्रतिनियुक्तीवर दुरुस्ती कामांसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन श्री. नाळे यांनी तडाखा बसलेल्या वीजयंत्रणेची व दुरुस्ती कामांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी अभियंते व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी समजून घेतल्या. अहोरात्र अविश्रांत काम करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी झुंज देणाऱ्या सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करून किंवा पर्यायी तसेच इतर तात्पुरत्या व्यवस्थेतून सर्वप्रथम वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. सद्यस्थितीत मावळ व जुन्नर भागातील 78 वगळता जिल्ह्यातील सर्व वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सद्यस्थितीत खंडित वीजपुरवठ्याबाबत ग्राहकांनी नोंदविलेल्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम वेगाने सुरु आहे. या संकटाच्या कालावधीत वीजग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले.
मावळ, जुन्नर तालुक्यांच्या दुर्गम व अतिदुर्गम, घनदाट झाडांच्या भागात वीजयंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यास वेग देण्यासाठी महावितरणच्या विविध योजनेतील जिल्ह्यातील कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पाचारण करण्यात आले आहे. हे कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना आवश्यक साधनसामग्रीसह रवाना झाले आहे. यासोबतच जिल्ह्यातील इतर भागातील अभियंते व कर्मचारी सुद्धा प्रामुख्याने मावळ, जुन्नर आदी भागात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत. वीजयंत्रणेच्या उभारणीसाठी दुरुस्ती कामाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे नियोजनपूर्वक काम करण्यात येत आहे अशी माहिती प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी दिली.
-------
*फोटो नेम* RD Visit *फोटो ओळ* – निसर्ग वादळाच्या तडाख्याने नादुरुस्त झालेल्या वीजयंत्रणेची पाहणी करताना पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे.
----------------------------------------