कर्जत तालुक्यात चक्रीवादळाने केले 5 कोटींचे नुकसान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 कर्जत,ता.6 गणेश पवार


                       कर्जत तालुक्यातील 3 जून रोजी आलेल्या चक्रीवादळाने कर्जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची घरे,शेती बागा आणि शासकीय मालमता यांचे साधारण 5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान,वादळाने 6215 शेतकऱ्यांचे नुकसान केले असून 250 शासकीय मालमता यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महावितरणची कोसळलेले खांब आणि वीज रोहित्र या सर्वांचे अंदाजे 5 कोटी रुपयांचे नुकसान निसर्ग चक्रीवादळ याने केले आहे.


                      3जून रोजी दुपारी दोन वाजता आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यात तब्बल चार तास धुमाकूळ घातला होता.मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून वीज पुरवठा करणारे महावितरणचे 200 हुन अधिक खांब कोसळले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या राहत्या घरांचे आणि शेत बागा यांचे वादळाने मोठे नुकसान केले आहे.त्यात 3194 पक्क्या घरांवरील छपरे उडून गेली असून कच्चा स्वरूपात असलेल्या 2663 घरांचे कौले आणि धापे उडून गेले असल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.झोपडी स्वरूपात असलेल्या 355 घरांचे वादळाने नुकसान केले असून आजच्या तारखेला छपरे उडून गेलेल्या साधारण 3215 घरांचे पंचनामे महसूल विभागाने पूर्ण केले आहेत.तर 412 शेतकऱ्यांच्या बागायती शेत पिकाचे वादळाने नुकसान केले असून त्या नुकसानग्रस्त 158 शेतीचे पंचनामे कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहेत.महसूल विभागाला पंचनामे करण्या कामी महसूल विभागचे तलाठी,मंडळ अधिकारी तसेच कर्जत पंचायत समिती विभागाकडून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी विभागाकडून कृषी सहायक,कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांची मदत मिळत आहे.वादळाने नुकसान केलेल्या सर्व 6215 घरांचे आणि शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू अर्धे पंचनामे करण्यात शासनाला यश आले आहे अशी माहिती कर्जत चे तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी पी टी रजपूत, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी दिली आहे.


                         याचबरोबर कर्जत तालुक्यातील शासकीय मालमतेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात ग्रामपंचायत कार्यालये, जिल्हा परिषदेचे विश्रामगृह, अंगणवाडी इमारत,प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक शाळा यांचा समावेश असून ही सर्व नुकसानीची आकडेवारी साधारण 5 कोटी रुवयांची असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. खासगी मालमता यांचे झालेले नुकसान हे शासनाच्या निकषाप्रमाणे निधी प्राप्त झाल्यानंतर वाटप केले जाणार आहे.