चित्रकलेतुन माथेरानकर व विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात, 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 चित्रकलेतुन माथेरानकर व विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात,


 


कर्जत दि.11 गणेश पवार


 


        जगात थैमान घातलेल्या कोरोना महामारीमुळे जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान येथेही लॉकडाउन करण्यात आले आहे. दिनांक 17 मार्चपासून माथेरानचे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये नागरिकांना मोठा आर्थिक संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांची व्यथा जाणून जागतिक दर्जाचे चित्रकार यांनी आपल्या कलेतून मदतीचा हात पुढे केला आहे. 


               कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगात प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये दि. 17 मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले. याठिकाणी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने बंदी घालण्यात आली. केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरानकरांसमोर यामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. मात्र माथेरान येथील नागरिकांना सावरण्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला होता. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळत होता. ही परिस्थती ज्ञात असलेल्या व येथील मातीत जन्माला आलेल्या जागतिक ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून माथेरानकरांना मदतीचा हात देण्याचे ठरवले. त्याकरता त्यांनी आपण काढलेले एक चित्र विकून ते पैसे माथेरानसाठी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हे समजल्यावर बोरिवली मुंबई येथील चित्र प्रेमी विवेक माणगावकर यांनी ते चित्र 50 हजार रुपयांना विकत घेतले. आपल्या चित्राच्या विक्रीतुन मिळालेले पैसे यापैकी बोरसे यांनी २५ हजार रुपये शालेय विद्यार्थ्यांकरिता दिले. प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे २५ विद्यार्थ्यांना त्यांनी दिनांक 11 जून रोजी स्वत: माथेरानला येऊन मदत वाटप केली आहे. तर माथेरान प्रतिष्ठानच्या माध्यमातुन धान्य, जीवनावश्यक वस्तू वाटपात या रक्कमेतील २५ हजार रुपये मदत दिली आहे. यावेळी बोरसे यांना विद्यार्थ्यांची यादी सुचवणारे माथेरान प्रेस कल्बचे अध्यक्ष मुकुंद रांजाणे, किरण चावरे, अमित घुमरे तसेच विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. चित्रकलेच्या छंदातुन माथेरानकर व विद्यार्थ्यांना देऊ केलेल्या योगदाना बद्दल पराग बोरसे यांचे सर्वच स्थरातुन कौतुक होत आहे. 


 


 


माथेरान हे माझे आजोळ आहे. इथल्या मातीतून मी चित्रकला शिकलो ती रेखाटली आहे. अशातच लॉकडाउन झाल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असल्या अनेकांचे उद्योग, धंदे बंद झाले. त्यामुळे त्यांना मदत म्हणून मी माझे चित्र विकून ती मदत माथेरानला देण्याचे ठरवले त्यानुसार ते चित्र विवेक माणगावकर यांनी विकत घेतले. तसेच या पैशातून विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. तेव्हा चित्रातून मिळालेल्या पैशातून विद्यार्थ्यांना मदत करून उर्वरित पैसे धान्य वाटपासाठी मी दिले आहेत. इथल्या लोकांसाठी माझी कला कामी आली हा माझ्या कलेचा सन्मान आहे. 


: पराग बोरसे, चित्रकार