जिल्हाधिकाऱ्यांनी 'इन्सिडंट कमांडर' म्हणून तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


जिल्हाधिकारी इन्सिडंट


 


पुण्यात नऊ मार्चला पहिला करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महसूल विभागाची जबाबदारी वाढली. अशा वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 'इन्सिडंट कमांडर' म्हणून तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवली. कोलते यांनीही विविध पातळ्यांवर समर्थपणे काम करून ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.


 


सुरुवातीच्या काळात संशयित करोनाबाधित रुग्ण शोधण्यापासून ते नागरिकांच्या अन्नधान्याची व्यवस्था, त्यांना मास्क पुरविणे, श्रमिकांना स्वगृही जाण्यासाठी पास देणे आणि मध्यरात्री उशिरापर्यंत रेल्वे स्टेशनवर थांबून श्रमिकांची पाठवणी करण्याचे आव्हान कोलते-पाटील यांनी पेलले आहे.


 


जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने साथरोग नियंत्रणाची जबाबदारी आहे. त्यांनी अधिकाऱ्यांमध्ये कामाचे वाटप केले. लॉकडाउनचे टप्पे जाहीर होत गेले, तसे अधिकाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल होत गेला. पहिला रुग्ण आढळल्यानंतर आणखी संशयित रुग्ण आहेत का, हे शोधण्याचे काम अर्थातच महसूल विभागाकडे आले. हे काम करताना 'टीम वर्क'ची आवश्यकता होती. त्यामुळे कोलते-पाटील यांनी पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यानंतर स्वत: रस्त्यावर उतरून त्या नियोजन करू लागल्या.


 


या अनुभवाबाबत तृप्ती कोलते पाटील म्हणाल्या, 'सुरुवातीच्या टप्प्यात संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी व्यवस्था करण्याचे काम करण्यात आले. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यांत रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर निवारा केंद्रांची व्यवस्था आणि तेथे येणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.


 


अशा वेळी जनसंपर्क उपयोगी आला. अनेक स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून श्रमिक, बेघर यांच्या निवाऱ्यासह जेवणाची व्यवस्था केली. तसेच, एक लाख सुती कापडाच्या मास्कची खरेदी करून त्याचे वाटपही त्यांनी केले आहे. डॉक्टरांना राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यासाठी ससून रुग्णालयापासून जवळचे हॉटेल आणि इन्स्पेक्शन बंगलो (आयबी) या ठिकाणी व्यवस्था केली.'


 


लॉकडाउनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यानंतर श्रमिकांना स्वगृही पाठविण्याची जबाबदारी पेलायची होती. श्रमिक आणि जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना पास देण्याचे काम त्यांच्याकडे होते. याबाबत त्या म्हणाल्या, 'माझा फोन नंबर संपर्कासाठी देण्यात आला होता. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठपर्यंत सतत नागरिकांचे फोन येत होते. प्रत्येक नागरिकाची अडचण समजून घेऊन समस्येचे निराकरण करणे आवश्यक होते. संयम राखून हे काम करण्यात यश मिळाले.'


 


आता लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यांत त्यांच्याकडे श्रमिकांची रेल्वेने पाठवणी करण्याचे काम आहे. हे काम करताना मध्यरात्री उशिरापर्यंत रेल्वे स्टेशनवर थांबावे लागत आहे. अशा वेळी कुटंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मात्र, कर्तव्य महत्त्वाचे असल्याने रात्री उशिरापर्यंत काम संपवून दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यात उत्साहाने कामासाठी हजर होतात.


 


.नऊ मार्चपासून सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री उशिरा घरी येत आहे. त्यामुळे कुटुंबाशी बोलायलाही सवड मिळत नाही. आमचे एकत्र कुटुंब असल्याने मुलांची काळजी करावी लागत नाही. माहेर आणि सासरला राजकीय पार्श्वभूमी असल्याने आव्हानांना सामोरे कसे जायचे, याचे बाळकडू घरातून मिळाले आहे. त्यामुळे नियोजन करून आणि कार्यालयातील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करीत आहे.


 


- तृप्ती कोलते-पाटील,


तहसीलदार, पुणे शहर