सनदी लेखापाल अर्थकारणाचा 'ऑक्सिजन'

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सनदी लेखापाल अर्थकारणाचा 'ऑक्सिजन'

जय छायरा यांचे मत; 'आयसीएआय'तर्फे लाईव्ह वेबिनारद्वारे करिअर कौन्सलिंग

पुणे : "माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सिजन महत्वाचा आहे. तसाच देशाच्या अर्थकारणाला आकार देण्यासाठी सनदी लेखापाल (सीए) गरजेचा असतो. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या 'सीए'ना देशासह परदेशातही मोठ्या संधी आहेत. त्यामुळे बारावीनंतर कोणीही सीए होऊ शकतो आणि आपल्या करिअरला योग्य वळण देऊ शकतो," असे मत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कौन्सिलचे सदस्य सीए जय छायरा यांनी व्यक्त केले.


 


दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स व सीए क्षेत्रातील संधी या विषयावर 'आयसीएआय'च्या पुणे शाखेतर्फे वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) आणि 'आयसीएआय' अभ्यास मंडळाच्या सहकार्याने युट्युबवरून लाईव्ह वेबिनारद्वारे मोफत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजिले होते. विदयार्थी आणि पालकांच्या मनातील अनेक शंकाचे निरसन करण्यासह सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीए नंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, याबाबत माहिती देण्यात आली.

 

'आयसीएआय'च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, 'डब्ल्यूआयआरसी' खजिनदार सीए आनंद जाखोटीया, सीए प्रसन्नकुमार, सीए के. डी. गारगोटे, सीए एम. एस. जाधव, पुणे शाखेचे चेअरमन सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशीनाथ पठारे आदींनी यात मार्गदर्शन केले.

 

 

सीए जय छायरा म्हणाले, "करिअरची निवड पुन्हा पुन्हा करता येत नाही. त्यामुळे हा टप्पा महत्वाचा असतो. तीन टप्प्यात सीए पूर्ण करता येते. वर्षातून दोनदा या परीक्षा होतात. सीएनंतर तुम्हाला उद्योग, सरकारी क्षेत्रात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करता येतो. सीएला अमेरिका, युरोप, आफ्रिका आदी देशांतही मोठ्या संधी आहेत. सीए करण्यासाठी कॉमर्स असलेच पाहिजे, असे नाही. विज्ञान किंवा अभियांत्रिकीचे विद्यार्थीही सीए करू शकतात. सीएबरोबर पदवी घेता येते. तंत्रज्ञानामुळे सीए क्षेत्रातही विविध पर्याय खुले झाले आहेत. आज ५० हजारपेक्षा अधिक सीए विविध देशांत काम करत आहेत."

 

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, "सीएचा अभ्यासक्रम आवाहनात्मक असला, तरी अवघड नाही. अगदी सामान्य कुटुंबातले विद्यार्थीही या परीक्षेत यश मिळवू शकतो. सीए इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल हबमुळे अभ्यासक्रम, लेक्चर्स उपलब्ध झाले आहेत. अतिशय कमी खर्चात होणारा हा अभ्यासक्रम असल्याने आपल्यातील जिद्द जागृत ठेवून याचा अभ्यास करावा."

 

प्रसन्नकुमार म्हणाले, "सीए देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान देणारा घटक आहे. यामध्ये येऊन देशसेवा करण्याची संधी मिळते. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. कॉमर्स अलिम्पियाड सारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा." एम. एस. जाधव यांनी सनदी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिला जातो. शिवाय विद्यार्थ्यांना काम करता करताही शिकता येते. त्यामुळे आपल्या जीवनाची दिशा ठरवून त्यानुसार सीएच्या अभ्यासक्रमाला यावे, असे सांगितले.

 

सीए अभिषेक धामणे यांनी वेबिनारचे संचालन केले. सीए समीर लड्ढा यांनी यांनी आभार मानले.