शिवाजीनगरमधील आजींकडून आमदारांनी घरी जाऊन स्विकारला पंतप्रधान सहाय्यता मदतनिधी - शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पुढाकार ; असे वृद्ध देखील कोरोना वॉरिअर्स 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


शिवाजीनगरमधील आजींकडून आमदारांनी घरी जाऊन स्विकारला पंतप्रधान सहाय्यता मदतनिधी -

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पुढाकार ; असे वृद्ध देखील कोरोना वॉरिअर्स 


पुणे : जगातील विविध देशांसह भारत देखील कोरोना विरुद्ध लढाईत उतरला आहे. उद्योगपतींपासून सामान्य व्यक्ती देखील आपापल्या परिने देशासाठी योगदान देत आहेत. शिवाजीनगर परिसरात देखील अशाच एका आजींनी या कार्यासाठी आर्थिक योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आणि शिवाजीनगरचे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी चक्क त्यांच्या घरी जाऊन ही मदत स्विकारत त्यांच्या कार्याला वंदन केले. 



शिवाजीनगर परिसरात राहणा-या सुधा काळे या ८५ वर्षांच्या आजींचा शिरोळे यांना फोन आला. मला देखील कोरोनाच्या लढाईमध्ये खारीचा वाटा द्यायला आहे. त्यासाठी मी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश तयार ठेवला आहे. मात्र, मला घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे तुम्ही कोणाला तरी धनादेश घेण्यासाठी पाठवता का, अशी विनंती त्यांनी शिरोळे यांच्याकडे केली. त्यावर शिरोळे यांनी इतर कोणालाही न पाठवता, स्वत:च त्यांच्या घरी घाऊन धनादेश स्विकारला.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, मला अभिमान वाटला की स्वत:हून फोन करून मदत देण्याची वृत्ती आजही आपल्या मातीत आहे. त्यामुळे मी स्वत:च त्यांच्या घरी गेलो. त्यांचे पती कै. श्रीनिवास काळे यांनी इच्छा बोलून दाखविली होती की देशासाठी काहीतरी योगदान द्यायचे आहे, त्याची पूर्ती म्हणून कै. श्रीनिवास काळे व कै. शिवगौरी काळे यांच्या स्मरणार्थ मदत देताना काळे आजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. या वयातही त्यांना देशसेवेसाठी काहीतरी करायचे आहे हे  बघून माझ्यामध्ये आणखी उर्जा निर्माण झाली, असा अनुभव सांगत आपण ही कोरोना विरुध्दची लढाई लवकरच जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

*फोटो ओळ : शिवाजीनगर परिसरातील ८५ वर्षांच्या आजी सुधा काळे यांच्या घरी स्वत: जाऊन शिवाजीनगरचे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे पंतप्रधान सहाय्यता निधीकरीता १ लाख रुपयांची मदत स्विकारत त्यांच्या कार्याला वंदन केले.