केंद्रीय पथकाकडून ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पहाणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


केंद्रीय पथकाकडून ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पहाणी
पुणे, दि. 11- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या ताडीवालारोड येथील प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना  व आरोग्य सुविधांबाबत केंद्रीय पथकाने पाहणी केली.
 कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या  पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले असून या पथकाच्या सदस्यांनी आज ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालयात क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या विविध कक्षांना भेट देवून  येथील आरोग्य व इतर सुविधांच्या आढावा घेवून ताडीवाला रोड परिसरातील लुंबिनी नगर, सिध्दार्थनगर येथील वस्त्यांची पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, साखर आयुक्त सौरभ राव तसेच केंद्रीयपथक प्रमुख केंद्रीय  सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त उप महासंचालक  डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. मानस प्रतिम रॉय तसेच समन्वय डॉ. अरविंद अलोने, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपस्थित होते.
 केंद्रीय पथकाने ढोलेपाटील रोड येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या या शाळेतील वैद्यकीय तपासण्यांबाबत आढावा घेतला. येथील नागरिकांना देण्यात येत असलेल्या चहा, नाश्ता, भोजना आदि सुविधांची माहिती घेतली.
 ताडीवाला रोड  परिसरातील लुंबिनी नगर, सिध्दार्थनगर येथील प्रतिबंधित क्षेत्राची देखील केंद्रीय पथकाने पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि साखर आयुक्त सौरभ राव यांनी या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण याबाबत माहिती दिली. केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधांबाबत माहिती घेतली. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने समन्वय राखत कोरोनाच्या या साथीला प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजना,  आरोग्य सुविधा याबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले.
 यावेळी पोलिस उपायुक्त महेंद्र रसाळ, नगरसेवक कुणाल राजगुरु, मेहबूब नदाफ, जावेद शेख, तसेच पुणे महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
 तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना साथीच्या प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजना, वैद्यकीय सुविधा याबाबत केंद्रीय पथकाला विस्तृत माहिती दिली.
000