महिलांच्या उत्थानासाठी काम करता आल्याचे समाधान रितू छाब्रिया यांची भावना; फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महिलांच्या उत्थानासाठी काम करता आल्याचे समाधान


रितू छाब्रिया यांची भावना; फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण


 


पुणे : "वर्षभराच्या कारकिर्दीत 'शहरांकडून गावाकडे' ही संकल्पना घेऊन महिला सबलीकरणाचे अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले. विधवा शेतकरी महिलांना शेतीसाठी साहाय्य, एड्सग्रस्त महिलांना शिवण मशीन, शालेय मुलींना सायकल, बचतगटांना व्यवसायासाठी साहाय्य, ज्येष्ठ नागरिकांना शिक्षण व साहाय्य, इन्क्युबेशन सेंटर, मुली व महिलांना कौशल्य प्रशिक्षण, कोरोनावरील उपायासाठी हाकेथॉन, निधी संकलनासाठी मॅरेथॉन असे विविध प्रकल्प राबवून महिलांच्या उत्थानासाठी काम करता आले याचे समाधान वाटते," अशी भावना फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रितू छाब्रिया यांनी व्यक्त केली.


 


फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची (फिक्की) महिला संस्था ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर रितू छाब्रिया बोलत होत्या. गेल्या वर्षात या सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सहकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.


 


रितू छाब्रिया म्हणाल्या, "ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या समन्वयातून काम करण्याचा प्रयत्न केला. जवळपास १५०० महिला आज स्वावलंबी झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० विधवा शेतकरी महिलांना बियाणे देऊन त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिले. यातील ६० टक्के महिला उत्तम शेती करत आहेत. भारत ऍग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या सहकार्याने ४० महिलांना कौशल्यविकास, कायदेशीर अधिकार आणि ऑनलाईन विक्री याचे प्रशिक्षण दिले. एचआयव्हीग्रस्त महिलांना शिलाईमशीन व प्रशिक्षण दिले. आज त्या महिला मुख्य प्रवाहात येत आहेत. आयटीआय आणि टाटा स्ट्राईव्हच्या मदतीने १४७ तरुणींना विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. 'स्वयम'अंतर्गत फ्लो सदस्यांसाठी विविध कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रे घेतली."


 


"नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या सहकार्याने इन्क्युबेशन प्रकल्प सुरु केला. ज्येष्ठ नागरिकांना अक्षरओळख व्हावी म्हणून आजीबाईचा शाळा सुरु केली. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्याची सोय व्हावी, याकरिता २२५ मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. निधी संकलनाच्या दृष्टीने 'फ्लो बाजार' आणि 'फ्लो मॅरेथॉन' महत्वाची ठरली.  'फ्लो बाजार'मधून मिळालेला निधी महिलांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी देण्यात आला. या उपक्रमाला माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिन्हा यांनी प्रोत्साहन दिले. फ्लो मॅरेथॉनमध्ये ९१०० लोकानी भाग घेतला. १० आणि २१ किलोमीटरमध्ये ही मॅरेथॉन झाली. 'एम्स' आणि 'पीडीडीएए' यांच्याकडून मॅरेथॉनचा गौरव झाला. गौरी शाहरुख खान यांच्यासह पुण्यातील अनेक नामवंत या उपक्रमात सहभागी झाले. यातून ५१ लाख रुपये संकलित झाले. विविध उपक्रमासांठी हा निधी वापरला गेला. वर्षभरात जवळपास ६७ उपक्रम राबवले गेले. याबरोबरच कृषी महाविद्यालयातील सात, तर नर्सिंगच्या चार विद्यार्थीना चार वर्षांकरिता शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यावर्षी सुरु केलेले उपक्रम पुढेही सुरु राहावेत, यासाठी हा निधी वर्ग केला आहे," असे छाब्रिया यांनी नमूद केले. 


 


कोरोनातील लढ्यात सहभाग


सध्या संपूर्ण जग कोरोनाग्रस्त आहे. यावर उपाय शोधण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने 'हॅक द कॉज इंडिया-ऑनलाईन हाकेथॉन' घेण्यात आली आहे. २५०० हजार लोकांनी यात भाग घेतला. त्यातून पाच विजेत्यांकडून त्यावर संशोधन सुरु आहे. कोरोनाच्या या काळात फ्लो सदस्य विविध मार्गाने समाजासाठी योगदान देत आहेत. पुणे चॅप्टरकडून कोविड रुग्णालयांना मदत केली जात आहे. सप्टेंबरमध्ये पुरग्रस्तांनाही मदत केली होती. जवळपास सहा लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. धान्य कीट्सही वाटण्यात येत आहेत. लॉकडाउनच्या काळातही फ्लो पुणेचे कार्य सुरु असून, तज्ज्ञांचे २५ लाईव्ह सत्र घेण्यात आले आहेत. भारत दाभोलकर, रजनीश कुमार, सीमा समृद्धी आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. आरोग्य, शिक्षण, शेती, कौशल्य विकास आदी क्षेत्रात फ्लो भरीव योगदान देत आहे. 'फ्लो'च्या अनेक उपक्रमांचे माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे यांच्यासह इतर मान्यवरांनी कौतूक केले असल्याचे त्यांनी सांगितले