मातीचे धरण पायथ्याशी असुनही गावंडवाडीमध्ये पाण्याची टंचाई

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मातीचे धरण पायथ्याशी असुनही गावंडवाडीमध्ये पाण्याची टंचाई 


कर्जत,ता.26 गणेश पवार


                             कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत मध्ये असलेल्या बहुतेक सर्व आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाईला सुरुवात झाली आहे. त्यातील गावंडवाडी मध्ये मातीचे धरण असून देखील त्या वाडीच्या लोकांना पिण्याचे पाणी नळपाणी योजना राबविण्यात शासन यशस्वी ठरले नसल्याने पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते.शासनाने टँकर सूरु केले असून पाणीटंचाई दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.


                              गावंडवाडी हि जेमतेम 40 घरांची वस्ती असलेल्या आदिवासी वाडीमध्ये पिण्याचे पाणी हे डोंगरावर वसलेल्या वाडीच्या पायथ्याशी आहे. त्या ठिकाणी दोन डोंगराच्या घळीमध्ये खासगी स्वयंसेवी संस्थेने 40 वर्षांपूर्वी मातीचा बंधारा बांधला होता. त्या बंधाऱ्यातून पिण्याचे पाणी उचलता यावे यासाठी हि व्यवस्था करून ठेवली होती. मात्र त्या मातीच्या बंधाऱ्याची साफसफाई अनेक वर्षे करण्यात आली नसल्याने बंधाऱ्यात माती आणि दगड येऊन मातीच्या धरणाचा आकार कमी झाला आहे. त्यावेळी त्यातील पाणीसाठा देखील कमी झाला असून मातीच्या बंधाऱ्याच्या खाली ग्रामपन्चायत कडून विहीर बांधून घेण्यात आली आहे. त्या विहिरीतून वाडी पर्यंत पाणी नेण्यासाठी वाडीमधील आदिवासी महिला यांना मोठा त्रास सहान करावा लागतो. 


                           कारण साधारण पाऊण किलोमीटर लांबीवर मातीचे धरण असून त्या ठिकाणी जाणारा रस्ता हा पूर्णपणे तीव्र उताराचा रस्ता असून डोक्यावर हांडे घेऊन जाणारा परतीचा रस्ता हा तीव्र चढाव असलेला आहे. त्यामुळे या गावातील महिलांच्या मदतीला सायंकाळी पुरुष मंडळी हि येत असते. त्यावेळी महिलांबरोबर पुरुषांच्या डोक्यावर देखील हांडे असतात. त्या ठिकाणी मातीच्या धरणाजवळ असलेल्या विहिरीतुन पाणी वाडीमध्ये आणण्यासाठी खासगी संस्थेने सोलर पॅनल बसवले आहे. मात्र आतापर्यंत अनेक वेळी ते पॅनल चोरीला गेले आहेत. त्यामुळॆ त्या पॅनल चा फारसा उपयोग आदिवासी ग्रामस्थ यांना होत नाही. दुसरीकडे शासनाने त्या ठिकाणी नळपाणी योजना राबविल्यास त्याचा फायदा आदिवासी महिलांना होऊ शकतो,परंतु शासनाने त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.