निफ्टी आणि सेन्सेक्सची सलग तिस-या ट्रेडिंग सत्रामध्ये वृद्धी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, ३० मे २०२०: भारतीय बाजार शुक्रवारी सलग तिस-या दिवशीही वधारला आणि सकारात्मक स्थितीत बंद झाला. सेन्सेक्स २२३.५१ अंक किंवा ०.६९% नी वाढला व ३२४२४.१० अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी ९०.२० अंक किंवा ०.९५ % नी वाढून ९५८०.३० अंकांवर बंद झाला. आयटी वगळता इतर क्षेत्रातील निर्देशांकांनी १ ते २ टक्क्यांनी वृद्धी केली.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की शुक्रवारच्या सत्रात १३९० शेअर्सचे मूल्य वाढले तर ९२ शेअर्सची घसरण झाली. तसेच १५९ शेअर्सचे मूल्य बदलले नाही. टॉप गेनर्समध्ये ओएनजीसी (५.१४%), बजाज ऑटो (४.१५%), सन फार्मा (३.८८%), आयटीसी (३.३८%) आणि हिरो मोटोकॉर्प (३.०८%) यांचा समावेश झाला. सेन्सेक्समधील लूझर्सच्या यादीत कोटक बँक (०.३८%), अॅक्सिस बँक (१.९६%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.५१%), टायटन (१.०२%), एमअँडएम (०.८३%) आणि टीसीएस (१.६८%) यांचा समावेश आहे. ब्रॉडर मार्केट निर्देशांकही वाढला. निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स आणि निफ्टी स्मॉल कॅप १०० इंडेक्सने आजच्या व्यापारात १ टक्क्याची वाढ होऊन ते अनुक्रमे १३,२७३ आणि ४,००२.८० अंकांपर्यंत पोहोचले.


 


इंट्राडेमधील प्रमुख कंपन्यांपैकी सर्वात मोठा गेनर व्होडाफोन आयडीया ठरला. कंपनीतील काही समभाग गूगल खरेदी करण्याच्या विचारात आहे, असे वृत्त फॉरेन पब्लिकेशनमध्ये प्रकाशित झाल्यामुळे कंपनीचे शेअर्स ३५ टक्क्यांनी वाढले. ही कंपनी भारतात दिवाळखोरीत निघणार, या चर्चेमुळे मागील एक वर्षापासून हा शेअर तणावात होता. आज मूल्यवृद्धी झालेल्या इतर शेअर्समध्ये आयटी सर्व्हिसेस कंपनी विप्रोचा समावेश आहे. कंपनीने थिअरी डेलापोर्ट यांना नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून घोषित केल्यानंतर हा शेअर (६.६५%) वाढून तो २१२.५५ रुपयांवर पोहोचला.


 


इतर शेअर्समध्ये डॉ. रेड्डीज लॅबची (४.०२%), जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स (३.६७%) आणि डिविज लॅब (३.४६%) एवढी वृद्धी झाली. सुव्हेन लाइफ सायन्सेसचे शेअर्स ४ टक्क्यांनी (३.९६%) घसरले तसेच अलकेम लॅब्स (३.०३%) आणि आरती इंडस्ट्रीज (१.१०%) मूल्याने घसरले. कोव्हिड-१९ मुळे शेअर्सवर मोठा परिणाम झाला असून आकडेवारीवरही याचा मोठा परिणाम झालेला दिसतो. बीएसई ५०० स्टॉक्समध्ये दर पाच शेअर्सपैकी तीन शेअर्स २४ मार्चपासून खालावले आहे.


 


जागतिक बाजारपेठेत घसरण:


 


जागतिक शेअर बाजार शुक्रवारी कोसळला. याचे कारण म्हणजे हाँगकाँगवरील नियंत्रण अधिक कठोर करण्याच्या चीनच्या घोषणेविरोधात कारवाई करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर गुंतवणूकदार पुढील कारवाईच्या प्रतीक्षेत होते. अमेरिका आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीवर आणखी होण्याची शक्यता आहे.