पुणे प्रवाह न्युज पोर्टल
तबलिगी मौलानांच्या बँक खात्यांची झडती घेणार; सर्व राज्यांकडून माहिती मागवली
____________________________________
निझामुद्दीन तबलिगी मरकज कोरोना प्रसाराचे केंद्र बनल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. देशभरातील तबलिगी जमातीची सर्व कार्यालये, मौलानांची माहिती दिल्लीपोलिसांनी विविध राज्यांकडून मागितली आहे. प्रत्येक मौलानाचे बँक खातेही तपासले जाणार आहे. मौलानांच्या कॉल्सची तपासणीदेखील सुरू केली.
दरम्यान, निझामुद्दीन मरकजमधील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या तबलिगी जमातच्या आणखी एकाचा आज दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत मरकजमधून आणखी ७७ रुग्णांची भर पडल्यामुळे येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५९ झाली आहे.
येथील हजारो लोक आपापल्या राज्यांमध्ये पोहोचले असून त्यांना स्थानबद्ध केले जात आहे. यात उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, अंदमान-निकोबार, आसाम, हिमाचल, तामिळनाडू, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड या चौदा राज्यांचा समावेश आहे. दिल्लीपाठोपाठ तामिळनाडूतही २१० तबलिगी जमातचे भाविक पॉझिटिव्ह आढळले.
राजधानीतील एकूण ३८४ पैकी २५९ मरकजशी संबंधित आहेत. ४८ तासांमध्ये मरकजमधील तिसर्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ५ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.