केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करणार - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात


धान्‍य वितरित करणार - जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम


            पुणे, दिनांक 24-   कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्‍यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मे व जून २०२० या महिन्‍यांकरिता अंत्‍योदय अन्‍न योजना व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना दि २५ एप्रिलपासून रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.


            शनिवारपासून मे महिन्‍याचे धान्‍य दुकानातून उपलब्‍ध होणार असून गहू  ८ रुपये प्रति किलो, तांदुळ  १२ रुपये प्रति किलो या दराने कार्डवरील प्रति व्‍यक्‍ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वितरित  करण्‍यात येणार आहे. पुणे शहरात केशरी शिधापत्रिकांची संख्‍या सुमारे ४ लाख ६० हजार असून लाभार्थी संख्‍या सुमारे २० लाख आहे.  पिंपरी-चिंचवडमध्‍ये हीच संख्‍या २ लाख ६५ हजार असून लाभार्थी संख्या सुमारे १० लाख इतकी आहे.  मे महिन्‍याकरिताचा ३८८७ मे. टन गहू व  २५७२ मे. टन तांदूळ स्‍वस्‍त धान्‍य दुकानामध्‍ये पोहोच करण्‍यात आलेला आहे. या धान्‍याचे वाटप रेशनकार्डवर 25 एप्रिलपासून सुरु करण्‍यात येत आहे. २५ एप्रिलपासून हे धान्‍य केवळ उर्वरित केशरी रेशनकार्ड धारकांनाच वाटप करण्‍यात येणार आहे. तसे अंत्‍योदय व अन्‍नसुरक्षा लाभार्थ्‍यांना मे महिन्‍याचे धान्‍य वाटप ५ मे पासून करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे.


            रास्‍तभाव दुकाने पोलिसांच्‍या सूचनांप्रमाणे पूर्ण वेळ सुरु राहतील, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले असून रास्‍तभाव धान्‍य दुकानांत पुरेसा धान्‍यसाठा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेला आहे. या धान्‍याचे वितरण लाभधारकांना  ३१ मे  पर्यंत करण्‍यात येणार असल्‍याने धान्‍य घेण्‍यासाठी गर्दी करु नये, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.  


रेशनकार्डधारकांसाठी हेल्‍पलाईन


रेशनकार्ड धारकांच्‍या तक्रार निवारणासाठी दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत.


टोल फ्री क्रमांक १०७७, मदत केंद्र क्रमांक ०२०-२६१२३७४६ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००)


मोबाईल क्रमांक ८१४९६२११६९ / ८६०५६६३८६६


         टोकन पध्‍दतीने धान्‍याचे वाटप - उक्‍त कार्डधारकांना धान्‍य वाटप करण्‍याचे सविस्‍तर नियोजन करण्‍यात आले आहे. सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांनी कार्डधारकांना धान्‍य वाटप करण्‍यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले असून कार्डधारकांना टोकन पध्‍दतीने धान्‍याचे वाटप करण्‍यात येणार आहे. सर्वप्रथम सकाळी निर्धारित वेळेचे टोकन कार्डधारकांना वाटप करण्‍यात येईल. सदर टोकनवर कार्डधारकाने  कोणत्‍या वेळी धान्‍य घेण्‍यासाठी यावे याची नोंद असेल. त्‍यानुसार दिलेल्‍या वेळेतच दुकानामध्‍ये जाऊन धान्‍य घ्‍यावे.  लाभार्थ्‍यांनी धान्‍य घेताना सोशल डिस्‍टंस (सामाजिक शिष्‍टाचार) ठेवावा आणि मास्‍कचा वापर करावा, असे आवाहन अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे.