महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळातर्फे विद्यार्थ्यांकरिता 'लर्न फ्रॉम होम' सुविधा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळातर्फे

विद्यार्थ्यांकरिता 'लर्न फ्रॉम होम' सुविधा

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्याचा शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला असून, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांवरही याचा परिणाम झाला आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत अजूनही शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये संदिग्धता आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाने 'लर्न फ्रॉम होम' सुविधा राबवली आहे.

 

संस्थेचे सचिव डॉ. विकास आबनावे व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रथमेश आबनावे यांनी संस्थेअंतर्गत सर्व शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक यांची 'व्हिडीओ कॉन्फरन्स'द्वारे बैठक घेतली. घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल व विद्यार्थ्यांना ज्ञानदान कसे करता येईल, याविषयी बैठकीत चर्चा झाली. व्हाट्सअपसह इतर ऑनलाइन व सोशल साइट्सच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी नियोजन केले जात आहे. दैनंदिन शिक्षण आराखडा तयार करून हे ई-साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जावे, अशा सूचना डॉ. विकास आबनावे यांनी दिल्या. इयत्तानिहाय पालक व शिक्षकांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात आहे. विद्यार्थ्यांना व्यक्तिगत फोन करुनही शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करत आहेत.

 

संस्थेच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सि. धो. आबनावे कला महाविद्यालय, हेमलता मारुतराव आबनावे प्राथमिक शाळा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र, कोंढव्यातील जडावबाई नारायणदासजी दुगड महाविद्यालय, कोळविहिरे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालय, बारामती येथील शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळांचे प्रमुख आणि शिक्षक-शिक्षकेतर या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

 

 

डॉ. विकास आबनावे यांनी उपक्रमाबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विषाणूबद्दलची माहिती आणि घ्यावयाची काळजी याबाबत अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन केले आहे. तसेच पुढील आठवड्यापासून संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेचे सचिव डॉक्टर आबनावे समुपदेशन करणार आहेत, असे प्रथमेश आबनावे यांनी सांगितले.