कोरोना झाल्याचे खोटे सांगून अंध व्यक्तीला रुग्णालयात केले दाखल, कुटुंबीय फरार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना झाल्याचे खोटे सांगून अंध व्यक्तीला रुग्णालयात केले दाखल, कुटुंबीय फरार
__________________________________


कोरोनाने सध्या देशभरात थैमान घातले आहे. रुग्णालयांमध्ये आणिबाणीची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याचाच फायदा घेत एका कुटुंबाने त्यांच्या घरातील व्यक्तीला अंध व्यक्तीला कोरोना झाल्याचे खोटे सांगून रुग्णालयात दाखल केले व त्यानंतर तेथून ते फरार झाले आहेत. सध्या रुग्णालयातील नर्सेस त्या व्यक्तीची काळजी घेत आहेत.


छत्तीसगढमधील रायपूर शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर व्यक्ती 50 वर्षांची असून ती पूर्णपणे अंध आहे. मंगळवारी या व्यक्तीचे कुटुंबीय त्यांना घेऊन रायपूरमधील एम्स रुग्णालयात आले होते. त्या अंध व्यक्तीला सर्दी खोकल्याचा त्रास होता. त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाची चाचणी करायची असल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना क्वारंटाईन कक्षात ठेवले व त्यांची चाचणी केली. दुसऱ्या दिवशी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समजल्यानंतर नर्स त्यांच्या कुटुंबीयांना शोधायला गेली तेव्हा रुग्णालयात त्यांना कुणीही सापडले नाही. त्यानंतर रुग्णालयात दिलेल्या कुटुंबीयांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता ते नंबर देखील चुकीचे दिल्याचे समजले. नंतर दिलेल्या पत्त्यावर पोलीस गेले असता तो पत्ता देखील खोटा दिल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी त्या अंध व्यक्तीला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. सध्या रुग्णालयातील कर्मचारीच त्या व्यक्तीची काळजी घेत आहेत.