पुणे ‘पॅटर्नʼमुळे अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा....... विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे ‘पॅटर्नʼमुळे अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा



पुणे दि.18 : -  लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोरोना साथीचा संसर्ग रोखण्याकरीता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरीता  प्रशासनाकडून  विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणजे आतापर्यंत विभागामध्ये जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा उपलब्ध होत आहे. 
 या जीवनावश्यक वस्तूंच्या साठयाबाबत व दररोज किती प्रमाणात आवक होत आहे याबाबतचा आढावा दररोज घेण्यात येतो. यामध्ये पुणे येथील मार्केटमध्ये विभागात 48 हजार 604  क्विंटल अन्नधान्याची सरासरी आवक असून भाजीपाल्याची सरासरी आवक 9 हजार 953 क्विंटल, फळांची 1 हजार 97 क्विंटल  तसेच कांदा / बटाट्याची 12 हजार 534 क्विंटल इतकी सरासरी आवक आहे. विभागात सरासरी 99.258 लाख लिटर दुधाचे संकलन होत असून सरासरी 22.906 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण होते. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात येते.
             स्थलांतरीत मजुरांच्या निवास व भोजन पुरवठयाबाबत शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार विभागामध्ये निवारा केंद्रे (रिलीफ कॅम्प) सुरु करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ देखील करण्यात येत आहे. विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत 142 व साखर कारखान्यामार्फत 1112 असे एकूण 1254 निवास केंद्रे स्थलांतरीत मजुरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 1 लाख 27 हजार 304 स्थलांतरीत मजूर असून एकूण 1 लाख 99 हजार 836 मजुरांना भोजन देण्यात येत आहे.
 विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर संभाव्य धोका ओळखला  आणि त्यादृष्टिने टप्प्याटप्प्याने पावले उचलण्यास सुरुवात केली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिला तर इतर समस्यांवर मात करणे अवघड नाही, हे लक्षात घेऊन नियोजन केले. व्यापारी महासंघ, दुध उत्पादक, दुध वितरक, अन्नधान्य व्यापारी, शेतकरी गट यांच्याबरोबर चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. उपस्थित करण्यात आलेल्या शंकाचे समाधान करण्यात आले. पुणे शहरातील निवासी सोसायटयांमध्येही पॅकेजिंग स्वरुपात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्रशासनाच्या नियोजनबध्द प्रयत्नांमुळे व निर्णयांमुळे  नागरिकांची गैरसोय मोठया प्रमाणात टळण्यास मदत झाली. हाच पुणे पॅटर्न इतर जिल्हयात अंमलात आणण्यात आल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिला.
     0 0 0 0