पालघरमधील त्या गावातील भाजप महिला सरपंचाच्या जीवितास धोका​​​​​​​

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पालघरमधील त्या गावातील भाजप महिला सरपंचाच्या जीवितास धोका​​​​​​​
___________________________________


पालघर जिल्ह्यातील गड चिंचले येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडा नंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे भाजपच्या सरपंचाने दिल्याच्या संशयावरून तिचे घरदार फोडून दोन्ही लहान मुलासह सर्वाना जीवे ठार मारू अशी धमकी अटक केलेल्या आरोपीचे नातेवाईक आपल्याला दिल्याने आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
दादरा नगर हवेलीच्या सीमेवर आणि डहाणू तालुक्यात असलेल्या गड चिंचले मध्ये साधू आणि त्या चालकाची कार वन विभागाने अडविल्या नंतर हळूहळू जमाव जमू लागला आपल्या मुलांच्या किडण्या काढण्यासाठी आल्याच्या संशयाने त्यांना जमावाने ताब्यात घेतले. सरपंच म्हणून त्यांना बोलाविण्यात आले असता कायदा हातात घेऊ नका पोलिसांना येऊ द्या असे त्यांनी सांगितल्या नंतर लोक माझ्यावर भडकले.तुमच्या दोन्ही मुलांना त्या साधूच्या ताब्यात द्या असे सांगून जमाव आक्रमक झाल्याचे सरपंचाचे म्हणणे आहे.


16 एप्रिल रोजी रात्री 8.45 दरम्यान मारहाण व दगडफेकीला सुरुवात झाल्याचे सर्व चित्रण वन विभागाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्डिंग झाले असून लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने व आक्रमक झाल्याने मी घरी निघून गेली.पोलीस आल्यानंतर मला पुन्हा बोलावण्यात आले.त्यावेळी दादा आला,दादा आला म्हणून उपस्थित लोकांनी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी आल्यावर आरोळ्या ठोकल्याचे सरपंचाने सांगितले.त्यांच्या उपस्थितीत तिन्ही लोक जिवंत होते.मात्र त्यांच्या समोर पोलिसांच्या गाडीत बसलेल्या त्या तिन्ही लोकांवर जमावाने हल्ला केल्या नंतर जिप सदस्य चौधरी यांनी लोकांना थांबविण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे सरपंच चौधरी ह्यांनी लोकमतला सांगितले. जमाव खूपच आक्रमक झाल्याने मलाही मारहाण होते की काय ह्या भीतीने मी घर गाठले.
ह्या प्रकरणी 5 प्रमुख आरोपीसह 101 आरोपी आणि 9 अल्पवयीन मुलाच्या विरोधात खून,खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्वाना अटक करण्यात आली आहे.ह्या प्रकरणातील सर्व आरोपींची नावे सरपंचांनी पोलिसांना दिल्याचा आरोप सरपंच चौधरी वर केला जात असून गावातील काही महिला आणि पुरुषांनी माझ्या घरात येऊन अटक केलेल्या सर्वाना सोडवं अन्यथा तुझे घरदार तोडून-फोडून तुझ्या मुलासह सर्वाना ठार मारू अशी धमकी दिल्याचे सरपंचांनी सांगितले.माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी सरपंचांनी पोलिसांकडे केली असताना पोलिसांकडून अजूनही आपल्याला संरक्षण दिले गेले नसल्याचे सरपंचांनी सांगितले.
ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असून आमदार सिपीएम तर जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी पक्षाचे आहेत.भाजपचे खासदार,आमदार असे अनेक वर्षांपासूनचे वर्चस्व निघून गेल्याने आता सेना, राष्ट्रवादी व सिपीएम ने वर्चस्व राखले आहे.त्यामुळे भाजप विरुद्ध विकास आघाडी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.