झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे दु:खद निधन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे दु:खद निधन*


ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे आज सकाळी ८ वा. खाजगी रुग्णालयात दु:खद निधन झाले.  उत्तम बंडू तुपे समरसता साहित्य परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते होते. समरसता साहित्य परिषद द्वारा आयोजित ७-९ जानेवारी २०१० या कालावाधीत नाशिक येथे झालेल्या १३ व्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.


'काट्यावरची पोटं' या आत्मचरित्राने ख्यातीप्राप्त झालेले उत्तम बंडू तुपे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगणे भाग पडलेले एक थोर लेखक होते. मोलमजुरी करून दिवस काढलेल्या या अल्पशिक्षित लेखकाने मराठीवर आपल्या लेखनाने आपली ठसठशीत नाममुद्रा उमटवली आहे. 'झुलवा' या त्यांच्या नाटकानेही त्यांचे साहित्य लेखनातले  वेगळेपण अधोरेखित केले आहे. त्या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या कादंबऱ्या, कथासंग्रहांचे त्यांचे लेखन आहे. विस्थापित, उपेक्षित, बेरोजगार, वंचित अशा जीवनाचे, त्यातल्या व्यथा,वेदनांचे विदारक चित्रण करणाऱ्या या लेखकामुळे मराठीत वेगळे, वगळले गेलेले लोक प्रवेशते झाले. मराठी लेखनाच्या, जीवनानुभवाच्या कक्षा त्यामुळे विस्तारल्या गेल्या हे त्यांचे मराठी वाङ्मयात मोठे योगदान आहे.


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगतात सामाजिक समरसता चळवळीतील आग्रही कार्यकर्ता आणि प्रतिभावान साहित्यिक म्हणून उत्तम बंडू तुपे चिरकाल स्मरणात राहतील.


विश्व मराठी परिषद आणि साहित्य सेतूच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली 🙏🙏🙏