पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*परळीत गर्दी टाळण्यासाठी धनंजय मुंडेंचे चोख नियोजन*
*भाजीपाला, फळे, दूध आदी विक्रीसाठी शेतकरी संस्था, शेतीगट, बचतगट, बेरोजगार संस्था, व्यापारी यांना विभागनिहाय परवाने देणार*
परळी (दि. १५) ---- : परळी शहर व ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आपत्ती व्यवस्थापन व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून, भाजीपाला, फळे, दूध, खवा आदी विक्रीसाठी शेतकरी संस्था, शेतीगट, बचतगट, बेरोजगार संस्था, व्यापारी यांना विभागनिहाय विक्रीसाठी परवाने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ना. धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी श्री. महाडिक व परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्या उपस्थितीत या समितीने याबाबत काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार आता फळे, भाजीपाला, दूध, खवा व अन्य दुग्धजन्य पदार्थ आदी विक्रेत्या परवाना धारकांना प्रभागनिहाय व परळीबाहेर गावनिहाय विभाग वाटून देण्यात येणार आहेत.
बाहेर गाववरून येणारी फळेही याच पद्धतीने विकली जाणार असून शहरात प्रभागनिहाय किराणा दुकानदारांनाही घरपोच किराणा देता यावा यासाठी परवाने व अन्य नियोजन करण्यात येणार आहे.
मासे, प्रॉन्स तथा तत्सम पदार्थांची विक्रीही यानुसारच केली जाणार आहे. यामुळे नागरिकांना आता खरेदीसाठी कुठेही जावे लागणार नाही. सदर जीवनावश्यक वस्तू या दारावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान संचार बंदीच्या काळात अंत्यविधीसाठी गरजू नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने तात्काळ निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरातील मोकाट जनावरांना जमा करून परिसरातील गोशाळेत दाखल करण्यात यावे अशा सूचना नगर परिषद प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
शहरातील बँका व पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना बँक कालावधीसाठी ओळखपत्रे देण्यात येतील तसेच केशकर्तन व्यावसायिकांना घरपोच सुविधा देता यावी यासाठी विशेष परवानेही देण्यात येणार आहेत.
*तीन शिवभोजन केंद्र तात्काळ सुरू करण्याचे निर्देश*
दरम्यान परळी शहरात १०० डबे पुरवू शकतील अशा क्षमतेच्या पात्र ठरलेल्या तीन शिवभोजन केंद्रे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश ना. मुंडे यांनी या समितीला दिले आहेत.
उन्हाळ्यात माठ, रांजण आदी मातीपासून बनवलेल्या सामग्रीच्या विक्रीवर अनेक व्यावसायिक अवलंबून असतात, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अशा विक्रेत्यांना परवानगी देण्याचा निर्णयही या समितीने घेतला आहे.
या सर्व निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी समितीने करून शहर व परिसरात होणारी गर्दी रोखावी तसेच या सर्व परवानाधारक विक्रेत्यांनी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून विक्री करावी यासाठी समितीने देखरेख करावी अशा सूचनाही ना. मुंडे यांनी दिल्या आहेत.