जागतिक कीर्तीचे महान तत्वज्ञानी, प्राच्यविध्यापंडित : शरद पाटील!*  *स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!*                               --श्रीमंत कोकाटे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*जागतिक कीर्तीचे महान तत्वज्ञानी, प्राच्यविध्यापंडित : शरद पाटील!*


 *स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!*


                              --श्रीमंत कोकाटे


                शरद पाटील हे महान संस्कृत पंडित होते.केवळ मॅट्रिक शिक्षण झालेल्या शरद पाटील यांच्यावर सत्यशोधक आणि वारकरी विचारांचा प्रभाव होता,पारंपारिक मार्क्सवाद्यांच्या मतभेदाने ते सखोल संस्कृत अध्ययनाकडे वळले. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी संस्कृतवरती प्रभुत्व मिळवले.पाणिनी व्याकरण,वेद, महाकाव्ये,पुराण,उपनिषद इ. संस्कृत साहित्य मुळापासून वाचले. भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञान त्यांनी अभ्यासले,ते केवळ पारंपारिक पुस्तकी संस्कृतपंडित नव्हते, तर इंडोलॉजी,पुरातत्वशास्त्र,स्त्रीवाद,राज्यशास्त्र, इतिहास,तत्वज्ञान,मानवशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांचे महाविद्वान होते.त्याला मार्क्सवादाची जोड असल्यामुळे ऐतिहासिक भौतिकवाद ते मांडू शकले.पण ते पारंपारिक मार्क्सवादी नव्हते,मार्क्स कोठे चुकला हे ते बी. टी. रणदिवे यांना सप्रमाण सांगू शकले. त्यामुळे शरद पाटील हे नवमार्क्सवादी ठरतात.भारतीय परिप्रेक्ष्यात मार्क्सला मर्यादा आहेत, हे ओळखून त्यांनी सांस्कृतिक लढा मांडला. 


                  शरद पाटील यांचा आवाका अँटोनिओ ग्रामचीपेक्षा मोठा होता.ते प्रतिमाप्रेमात अडकले नाहीत त्यामुळे ते बुद्ध, शिवाजीमहाराज ते डॉ. आंबेडकर मांडू शकले.त्यांना स्वतःला सर,साहेब म्हटलेले आणि पाया पडलेले बिलकुल आवडत नसे, हे ते सर्व त्यांनी त्यागलेल्या इगोमुळे घडले.त्यांच्या ज्ञानाचा परिप्रेक्ष्य जागतिक स्तरावरील होता,पण पाय कायम जमिनीवर होते.त्यांना भेटायला येणाऱ्याशी ते कधीही झोपून बोलले नाहीत,ते अगदी नव्वद वर्षाचे झाले तरी उठून बसायचे आणि नंतर बोलायला सुरू करायचे.ते परखड होते,पण त्यांनी वैचारिक विरोधकांचाही कधी अनादर केला नाही.ते कर्मठ नव्हते,त्यामुळेच ते बहुप्रवाही अन्वेषण करू शकले.पण आपल्या मतांशी ठाम होते.त्यांना प्रतिवाद आवडायचा,पण तो अभ्यासू,दर्जेदार,सुसंस्कृत आणि निकोप असायला हवा,हे त्यांचे मत होते.


                        शरद पाटील यांच्या संशोधनाची पद्धत एकप्रवाही नव्हती,तर ती बहुप्रवाही असल्यामुळे ते मूलभूत संशोधन करून दडपला गेलेल्या इतिहासाची उकल करू शकले.ते जाणीवणेनिव अन्वेषण पद्धतीचे जनक आहेत, म्हणजे त्यांनी सिग्मन फ्राईडच्या पुढचा टप्पा गाठला.शरद पाटील हे इंडोलॉजीबरोबर मानसशास्त्र,तर्कशास्त्र ज्ञानाशाखांचे अभ्यासक होते.गणिताची मदत घेण्यासाठी त्यांनी कुलगुरू डॉ. नानासाहेब ठाकरे,डॉ. के. बी. पाटील या गणितज्ञाची मदत घेतली,त्यांचा आवाका जागतिक स्तरावरचा असल्यामुळे ते जागतिक तज्ञ ठरतात.


                   शरद पाटील हे पारंपारिक किंवा पुस्तकी पंडित नव्हते .ते दिवसा आदिवासी,कामगार,शेतकरी,महिला इत्यादींच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे होते आणि रात्री त्यांचा इतिहास लिहिणारे क्रान्तीकारक इंडोलॉजिस्ट होते. धुळे येथील सन 2004 च्या पुरंदरेंच्या विरोधातील मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले,शुगर,बीपी असताना उन्हात चालून त्यांनी पुरंदरेला विरोध केला.आपण जागतिक स्तरावरचे असताना पुरंदरेला विरोध करायला रस्त्यावर कसे यायचे? हा स्वार्थी विचार त्यांनी केला नाही.जेम्स लेन प्रकाराचे मूळ हे भांडारकरी भटात कसे आहे, हा प्रदीर्घ लेख त्यांनी लिहिला.अनेक आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला, पण ते मागे हटले नाहीत,ते लढणारे होते,रडणारे नव्हते.ते आपल्या जागतिक स्तरावरील पांडित्याला कुरवाळत बसणारे नव्हते, तर भूमिका घेणारे होते.प्रतिमा प्रेमात ते अडकले नाहीत.


                 शरद पाटील यांना कोणाचेही भक्त झालेले आवडत नव्हते,भक्त झालात तर विचार करायची क्षमता संपते,त्यामुळे नवनिर्मितीला अडथळा निर्माण होतो,असे त्यांचे ठाम मत होते.त्यामुळेच त्यांनी मेंडकाची कथा मांडली.व्यक्तिप्रेमात अडकलात की व्यक्ती चुकला तर त्याच्यामागे फरफटत जावे लागते,त्यामुळे ते स्वतःला आप्पा,सर,साहेब म्हणून घेत नसत.ते स्पष्ट सांगत  "मला शरद पाटील किंवा कॉम्रेड(भाऊ)म्हणा"  पाया पडून घेणे हे आज्ञाधारकतेपेक्षा वर्चस्ववादाचे लक्षण आहे,असे ते मानत.


             शरद पाटील त्यांच्या मार्क्सवादी,    अब्राह्मणी,बहुप्रवाही,जाणीवणेनिव दृष्टिकोनामुळे  निऋती,आंबपाली, शूर्पणाखा इत्यादिंचा दडपलेला इतिहास मांडू शकले.जगात सुरुवातीला स्त्रीराज्ये होती. निऋती ही सप्तसिंधु खोऱ्यातील आद्य महाराणी होती, हे त्यांनी "दासशूद्राची गुलामगिरी" या जगप्रसिद्ध ग्रंथात मांडले.हा त्यांचा अभिजात ग्रंथ आहे.याबाबत झालेल्या वादात ते संस्कृत पंडित डॉ. एम. ए. मेहंदळे यांना पुरून उरले.आंबपाली ही वेश्या नसून वैशालीच्या स्त्रीराज्याची महाराणी होती, हे मांडून शरद पाटील यांनी महापंडित राहुल सांस्कृतयायन यांचे खंडन केले.शूर्पणखा म्हणजे हाताच्या बोटाच्या सुंदर नखावरती लीलया सूप धरून धान्य पाकडणारी जनस्थान तथा नाशिक म्हणजे गोदावरी खोऱ्याची महाराणी होती, तिचे स्त्रीराज्य आर्यराज्यविस्तारक रामाने संपवले,असे शरद पाटील "रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष" या ग्रंथात मांडतात.यासाठी ते अभिजात संदर्भ देतात.महान प्राच्यविद्यापंडित डी. डी. कोसंबी, आर. एस. शर्मा, राहुल सांस्कृत्यायन,भांडारकर,रोमिला थापर जेथे थांबतात तेथून शरद पाटील सुरू होतात, म्हणजे शरद पाटील हे जागतिक स्तरावरचे प्राच्यविद्यापंडित ठरतात,पण तशी ओळख सांगायची गरज त्यांना कधीही भासली नाही.ते जागतिक स्तरावरील प्राच्यविद्यापंडित असून देखील,त्यांनी त्याचा टेम्बा मिरविला नाही.


                      शरद पाटील यांनी अनेक नामवंत पुरस्कार नाकारले,पैसा,प्रसिद्धी, प्रमोशन,प्रतिष्ठा,पुरस्कार याचा हव्यास न धरता त्यांनी हयातभर संशोधन,लेखन आणि प्रबोधन केले.त्यांचे साहित्य सामान्य कार्यकर्त्याला कळते,पण विद्वानांना का समजत नाही,याचे त्यांना आश्चर्य वाटायचे,प्रामाणिकपणे वाचले तर शरद पाटील यांचे साहित्य समजायला खूप सोपे आहे.त्यांचे साहित्य खूप कठीण आहे, हा विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे.       
           
                      शरद पाटील यांनी गौतम बुद्धाचे,शिवरायांचे,संभाजीराजांचे क्रान्तीकारक चरित्र लिहिले आहे.संभाजीराजांच्या सल्ल्यावरून शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक केला, इतकी मोठी योग्यता आणि विद्वता संभाजीराजांची होती,संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले, त्यामुळे त्यांचा प्राण वाचला, अन्यथा ब्राह्मणमंत्र्यानी त्यांना त्यावेळेसच ठार मारले असते,हे अन्वेषण शरद पाटील करू शकले, हे त्यांच्या अब्राह्मणी दृष्टिकोनामुळे.


                       शरद पाटील यांनी इतिहासपूर्वकाळापासून ते प्राचीन,मध्ययुगीन ते आधुनिक इतिहासकाळापर्यंतचे विपुल आणि मूलभूत लेखन केले आहे,शरद पाटील यांच्या संशोधनाबद्धल संत तुकाराम महाराज चरित्राचे गाढे अभ्यासक, इतिहास,धर्मशास्त्र,संस्कृत,तत्वज्ञान आणि संतसाहित्याचे महान भाष्यकार डॉ. सदानंद मोरे म्हणतात "बहुजनांच्या ज्ञानाचा बॅकलॉक एकट्या शरद पाटील यांनी भरून काढला."


                    शरद पाटील यांनी आजन्म खूप अनमोल कार्य केलेले आहे,त्यांनी कोणाचा द्वेष केला नाही,वैचारिक मतभेद असणारांशी त्यांनी कधीही वैरभाव ठेवला नाही,मी डेक्कन कॉलेजमध्ये शिकत आहे, हे सांगितल्यानंतर त्यांनी डॉ. मेहंदळे यांची आस्थापूर्वक विचारपूस केली. डॉ. मेहंदळे यांच्याबाबत देखील ते नेहमी आदराने बोलायचे,त्यांनी गटबाजी केली नाही,आपले हितचिंतक आपल्या वैचारिक विरोधकांच्या अंगावर सोडले नाहीत.त्यांना वैचारिक वाद आवडायचा.आक्षेप घेणारांना त्यांनी कधीही टार्गेट केले नाही, तर त्यांच्या मताचा आदर केला.शिवाजीराजांवरील पुस्तकाचा प्रतिवाद करण्याचे आव्हान त्यांनी 1992 साली मुंबईच्या सभेत केले,त्याप्रसंगी ते म्हणाले "या आणि शिवाजीवरील या पुस्तकाबाबत डिबेट करा" त्यानंतर ते 21 वर्षे जिवंत होते.त्यांचा प्रतिवाद करण्याची हिंमत त्यांच्या हयातीत कोणत्याही विद्वानांनी दाखवली नाही,.हयातीत कोणी प्रतिवाद केला असता तर त्यांना त्याचा आनंदच झाला असता व नवीन मांडणी समोर आली असती.त्यांना अतीव ज्ञानाचा गर्व-अहंकार नव्हता. 


                    शरद पाटील यांचे मोठेपण जेवढे त्यांच्या विद्वतेत आहे,तेवढेच त्यांच्या रोखठोक भूमिकेत आहे,आत एक, बाहेर दुसरे असा ढोंगीपणा त्यांच्याजवळ नव्हता.त्यांनी वेळच्या वेळी भूमिका घेतली.रिडल्स प्रकरणात त्यांनी भूमिका घेऊन डॉ.आंबेडकरांच्या पुष्ट्यर्थ वाल्मिकी रामायणातील पुरावे देऊन विरोधकांना पराभूत केले.नामांतराच्या लढ्यात भूमिका घेतली.जेम्स लेन प्रकरणात त्यांनी भूमिका घेतली.विद्वानांनी संशोधनाबरोबरच रस्त्यावरची लढाई लढायची असते, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला.


                  शरद पाटील हे एक अत्यंत रोखठोक,निर्भीड,प्रामाणिक,हिम्मतवान फिलॉसॉफर,इंडोलॉजिस्ट होते.सस्वतःची आणि मानव समूहाची उंची वाचविण्यासाठी त्यांची ग्रंथसंपदा आवर्जून वाचा, त्यांना समजून घेण्यासाठी त्यांचे तत्वज्ञान मुळापासून वाचावे,हीच त्यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली!


                      ----श्रीमंत कोकाटे
                  ( इतिहासाच अभ्यासक )