पुणे प्रवाह न्युज पोर्टल
लॉकडाऊनमुळे कर्जत तालुक्यातील फुले कोमेजली, फुल उत्पादक शेतकरी चिंतेत, रोज हजारोंचे नुकसान
कर्जत दि. 13 गणेश पवार
एरवी केसात माळला जाणारा गजरा असो कि श्रद्धेने देवाला वाहिला जाणारा हार असो या सगळ्यासाठी लागणारी फुले सध्या शेतातच सुकून जात आहेत. कोरोना विषाणूने जगभर घातलेल्या थैमानामुळे महाराष्ट्रातही लॉकडाऊन २३ मार्चपासून सुरु करण्यात आले. बाजारच बंद असल्याने शेतात फुलणारी फुले शेतातच कोमेजत आहेत. यामुळे फुलउत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून रोज हजारो रुपयांचे होणारे नुकसानाने जगायचे कसे असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडला आहे.
रायगड जिल्ह्यातला कर्जत तालुका हा मूळचा भाताचे कोठार असा नाव लौकिक असणारा तालुका. या तालुक्यात पारंपरिक भातशेती केली जात असे. मात्र यानंतर आधुनिकतेची कास धरत शेतकऱ्यांनी भाताव्यतिरिक्त वेगळी पिके घेण्यास देखील सुरवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना या शेतीतूनच अधिक नफा मिळालीला लागला. असेच दहिवली येथे यशवंत भवारे यांची सुमारे साडेचार एकर शेती आहे. या शेतातील २ एकरात त्यांनी फुलशेती बहरवली आहे. मोगरा, नेवाळी, तुळस अशी पिके त्यांनी या शेतात लावली आहेत. ५ गुंठे क्षेत्रात नेवाळी, २० गुंठे क्षेत्रात मोगरा व उर्वरित दीड एकरात त्यांनी तुळशीची लागवड केली आहे. नेवाळी व मोगऱ्याच्या फुलातून काढणी केल्यावर साधारण ३०० रुपये किलोने हि फुले विकली जातात तर तुळशीतून साधारण रोजचे दीड ते दोन हजार रुपये उत्पन्न ते घेतात. मुंबईतील दादर येथे फुलांची मोठी बाजारपेठ असल्याने बहुतेक सर्व माल हे काढणी केल्यावर तिथे विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र मागील काही दिवसात कोरोनाने जगभर माजवलेल्या हाहाकाराने महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सगळीकडे बाजारपेठ बंद आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर देखील त्याचा मोठा प्रभाव पडला परिणामी रोजची तयार होणारी फुले हि शेतातच सुकू लागली आहेत. तर काढणी न केल्याने तुळस देखील सुकून गेली आहे. आपल्या कष्टाने तयार केलेली आपली शेतीची हि वाईट अवस्था शेतकऱ्याला आपल्याच डोळ्यांनी बघावी लागत आहेत. त्यामुळे हे फुल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. रोजचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याने तसेच अनिश्चित काळासाठी असलेल्या लॉकडाऊन काळानंतर असणाऱ्या पावसाळ्यात खायचे काय असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. कोरोनामुळे मृत्यू येईल कि नाही हे माहित नाही मात्र भूकबळीने जीव जाईल अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. तेव्हा शासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
चौकट
दहिवली तर्फे वरेडी येथे माझी साडेचार एकर शेती आहे. त्यातील २ एकरात मी आंतरपीक म्हणून मोगरा, नेवाळी, तुळस अशी शेती केली होती त्यापासून चांगला नफा आम्हाला मिळत होता. मात्र लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर बाजारपेठा बंद झाल्या त्यामुळे आमची पिकांची फुले शेतातच सुकायला लागली. रोजचे जवळपास साडेतीन हजार रुपयांचे नुकसान होत आहे. शेतीवर घर अवलंबून असल्याने शासनाने आम्हा फुलशेती उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो.
: यशवंत भवारे, फुलउत्पादक शेतकरी