राज्यातील सर्व देवस्थानांना त्यांच्या तिजोरीतील असलेली रक्कम शासनाला बिनव्याजी देण्याबाबत आवाहन..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रति,
मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब 
मुख्यमंत्री 
महाराष्ट्र राज्य 


विषय : राज्यातील सर्व देवस्थानांना त्यांच्या तिजोरीतील असलेली रक्कम शासनाला बिनव्याजी देण्याबाबत आवाहन..


महोदय, 
कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे आज सर्वत्र लॉकडाऊन आहे. जगण्यासाठी लोकं कासावीस झाली आहेत. सरकार म्हणून आपण आपले कर्तव्य उत्तमरित्या पार पाडत आहात ;पण  जिथे कोरोनामुळे सारेकाही ठप्प पडले आहे, तिथे राज्यसरकारालाही महसुलाचा प्रश्न भेडसावत आहे. लोकं अन्नासाठी आज देवाचा धावा करीत आहेत. जगण्यासाठी धडपडत आहेत. मग अशा या बिकट परिस्थितीत ठोस उपाययोजनांसाठी देश असो किंवा राज्य या दोघानांही महसुलाची अत्यंत गरज आहे . कारण कोरोनाला हद्दपार करण्यासाठी, जनतेच्या जीवितासाठी उपाययोजना करण्यासाठी महसुल अनिवार्य आहे. त्यामुळेच आता मद्य विक्रीला लॉकडाऊनच्या कालावधीत परवानगी  देण्याची सूचना अंमलात आणण्यापेक्षा राज्यातील सर्वच देवस्थानांना आवाहन  केले तर आपल्याला इतका निधी मिळेल जो केवळ मद्य विक्री नाहीतर वर्षभरात मिळणाऱ्या महसुलापेक्षा अधिक असेल. त्यासाठी  जनतेने देवाला घातलेल्या साकडे पोटी दानपेटीत जमा झालेली   ८० टक्के रक्कम बिनव्याजी
देवस्थानांनी  द्यावी, सरकार ती रक्कम नंतर परत करेल असा करारनामा करणे उचित ठरले. अन्यथा आज गरीब जनता अन्नासाठी देवाचा धावा करत असताना जर मद्यविक्रीला परवानगी दिली तर लोकांच्या  घरी अन्नासाठी असलेले पैसे राहणार नाहीत. कौटुंबिक हिंसाचार वाढेल  शिवाय मद्यविक्री अनेक संकटाना निमंत्रण देणारी ठरेल. राज्यातील जनतेची वर्गवारी पाहिल्यास त्याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे मद्यविक्री परवानगी पेक्षा जनतेने विविध देवस्थानांना दिलेल्या देणगीरुपी रकमेचा विनियोग या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसा करून घेता येईल याला आपण प्राधान्य द्यावे. हजारो कोटी रुपये जनतेनेच देवांना दानपेटीत  अर्पण केलेले आहेत, ते तिजोरीत तसेच पडून राहण्यापेक्षा देवस्थानांशी लेखी करार करून बिनव्याजी ते वापरावेत आणि ते पुन्हा त्यांना परत करावेत. आज देवाचा धावा करणाऱ्या जनतेला देवस्थानांकडे जनतेनेच दिलेल्या दानाचा आधार मिळावा.  कृपया याचा आपण प्राधान्याने विचार करावा ही  नम्र विनंती.   
कळावे 
आपला 
श्री. आबा बागुल 
मा. उपमहापौर, पुणे 
प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस 
मा. श्री .उल्हास दादा पवार 
मा. आमदार