स्मार्टफोनच्या अतिवापराने श्रवणदोष होण्याचा धोका अधिक*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


#PRESSNOTE


*स्मार्टफोनच्या अतिवापराने श्रवणदोष होण्याचा धोका अधिक*


डॉ. कल्याणी मांडके; जागतिक श्रवण दिनानिमित्त विज्ञान परिषद व रसायनशास्त्र विभागातर्फे व्याख्यान



पुणे: "आजघडीला भारतात जवळपास ३८ कोटी भ्रमणध्वनी वापरात आहेत. त्यातील ४०% स्मार्टफोन असून, २०२२ पर्यंत ही संख्या ४४ कोटीच्या पुढे जाईल. या फोनचा वापर तरुणाई प्रामुख्याने संगीत व इतर करमणुकीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी हेडफोन किंवा इअरबडच्या सहाय्याने करते. जास्त काळासाठी अशा पद्धतीने श्रवण केल्यास श्रवणशक्तीवर तात्पुरते, तसेच दूरगामी परिणाम दिसून येतात. स्मार्टफोनच्या अतिवापराने श्रवणदोष होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्याचा वापर आणि आवाजाची तीव्रता मर्यादित ठेवणे हिताचे आहे," असे मत मांडके हीअरिंग सर्व्हिसेसच्या डॉ. कल्याणी मांडके यांनी व्यक्त केले.


 


जागतिक श्रवण दिनाचे (३ मार्च २०२०) औचित्य साधून मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग व रसायनशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'आरोग्यासाठी आनंददायी आणि सुरक्षित श्रवण' या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. कल्याणी मांडके बोलत होत्या. रसायनशास्त्र विभागात झालेल्या या व्याख्यानावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष व व्याख्यानाच्या समन्वयक डाॅ. निलीमा राजुरकर, सदस्य डाॅ. सुजाता बरगाले, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मोहन कुलकर्णी, डॉ. कुमारी दिम्या, तन्मय इलमे, गणेश शिंदे, पूजा ढोरगे आदी उपस्थित होते.


 


डॉ. कल्याणी मांडके म्हणाल्या, "जागतिक आरोग्य संस्थेच्या पाहणीनुसार सुमारे ४६६ दशलक्ष व्यक्ती श्रवणदोषाने बाधित आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे याची व्याप्ती वाढतच असून, त्यावर नियंत्रणासाठी जनजागृती आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संस्थेने ३ मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून घोषित केला असून, त्याची संकल्पना 'जीवनासाठी श्रवण : श्रवणदोषाने तुमचे आरोग्यदायी जीवन मर्यादित करू नका' अशी आहे. अहवालानुसार ११० कोटी तरुण व्यक्तींना श्रवण क्षमता कमी होण्याचा धोका आहे. आवाजाची तीव्रता आणि वापर श्रवणाची सुरक्षित पातळी ठरवतात. जास्त काळासाठी इअरबड वापरायच्या झाल्यास आवाजाची तीव्रता कमी ठेवणे हितावह असते."


 


प्रा. मोहन कुलकर्णी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डाॅ. मांडके यांनी आपल्या व्याख्यानात श्रवण प्रक्रिया, श्रवणदोष, सतत मोठा आवाज ऐकल्याने श्रवण क्षमतेवर होणारे परिणाम याविषयी माहिती दिली. तन्मय इलमे, गणेश शिंदे, पूजा ढोरगे,  डाॅ. कुमारी दिम्या यांनी जनजागृतीसाठी श्रवणसंबंधित विषयांवर भित्तीपत्रकाद्वारे सादरीकरण केले आणि उपस्थितांची श्रवण चाचणी घेतली. राजेंद्रकुमार सराफ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सुजाता बरगाले यांनी विज्ञान परिषदेच्या कार्याविषयी माहिती दिली. डॉ. निलीमा राजुरकर यांनी आभार मानले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*