इमेल फिमेल २० मार्चला चित्रपटगृहात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


इमेल फिमेल २० मार्चला चित्रपटगृहात
सोशल मिडियाने आपले महत्त्व वेळोवेळी सिद्ध केले असले तरी या माध्यमाच्या अनेक नकारात्मक गोष्टीही समोर येत असतात. हे माध्यम दुधारी शस्त्रासारखे आहे. याचा योग्य वापर केला, तर फायदा नक्की अन्यथा त्याच्या आहारी जाऊन नको ती पावले उचलली, तर आयुष्याची वाताहत व्हायला वेळ लागणार नाही हे दाखवून देणारा ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट २० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एस.एम.बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.
समाजमाध्यमांचा गैरवापर सध्या खूप वाढला आहे. या माध्यमांद्वारे येणाऱ्या माहितीची सत्यता न पडताळता त्याच्या आहारी जात अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या घटना घडल्या आहेत. कित्येक वेळा खास हेतूने किंवा प्रलोभनामुळे चुकीची पावलं उचलली जातात. अशाच प्रलोभनाला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय सर्वसामान्य शंतनूची गोष्ट ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. एका कॉलगर्ल्सने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवल्यानंतर शंतनूच्या आयुष्यात उडालेला गोंधळ व हा गोंधळ निस्तरताना झालेलं मानसिक व कौटुंबिक नुकसान यावर हा चित्रपट भाष्य करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्यांसोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुण सुद्धा या सगळ्यासाठी तेवढेच जबाबदार असतात हे दाखविण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे.
निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन यांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत.
चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.
‘इमेल फिमेल’ २० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.