स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोह वेलणकरचा सिनेमॅटिक स्टेज शो ‘वीर’

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोह वेलणकरचा सिनेमॅटिक स्टेज शो ‘वीर’


स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच्या संघर्ष, त्याग आणि क्रांतीची यशोगाथा आता लवकरच नाट्यमय स्वरूपात रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. शीवलीला फिल्म्स निर्मित आरोह वेलणकर दिग्दर्शित ‘वीर’ ह्या सिनेमॅटिक स्टेज शोव्दारे विनायक दामोदर सावकरांच्या तेजस्वी जीवनाचा अलौकिक प्रवास 30 एप्रिलपासून उलगडणार आहे.


नुकतीच ‘वीर’ नाटकाची पत्रकार परिषद झाली. ह्या पत्रकार परिषदेमध्ये वीर नाटकाच्या मोशन पोस्टरचे अनावरण झाले. वीर नाटकाची संकल्पना कशी सुचली हे सांगताना ह्या नाट्यकृतीव्दारे दिग्दर्शनात पदार्पण करणारा अभिनेता आरोह वेलणकर म्हणाला, “मी लहानपणापासून वीर सावकरांच्या संघर्षमयी प्रवासाचा आणि साहसी वृत्तीचा चाहता राहिलो आहे. त्यात दोन वर्षांपूर्वी मी अंदमानला गेलो असताना सावरकरांच्या तुरूंगवासाची साक्षीदार असलेली सेल्युलर जेल पाहायला गेलो. आणि त्यांच्या ओजस्वी व्यक्तिमत्वाचा ठसा तिथेही जाणवला. त्यानंतर सावरकरांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारे एक महानाट्य घेऊन येण्याची संकल्पना सुचली.“


वीर नाटकाचे निर्माते शिवम लोणारी ह्यांचे हे पहिलेच नाटक. यापूर्वी शिवलीला फिल्म्सव्दारे त्यांनी ‘बर्नी’, ‘चिनु’, ‘साम दाम दंड भेद’ आणि ‘गुलदस्ता’ अशा सिनेमांची निर्मिती केली आहे. नाट्यसृष्टीत निर्माता म्हणून पाऊल ठेवताना शिवम लोणारी म्हणाले, “वीर सावरकरांचा संपूर्ण जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आजच्या पिढीला त्यांचा प्रेरणादायी जीवनपट सांगणं गरजेचे आहे, असे आम्हांला वाटले. त्यांचे मातृभूमीसाठीचे योगदान जेवढे मोठे आहे, तेवढाच त्यांचा जीवनप्रवास भव्य पध्दतीने दाखवावा असा विचार मनात आला आणि ह्या महानाट्याची निर्मिती केली.”


वीर सावकरांवरच्या ह्या महानाट्यात वाळु कलेपासून रेडियम पेंटिंगपर्यंत सुमारे 8 विविध कलाप्रकारांचा वापर करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूणे, लंडन, अंदमान आणि रत्नागिरीच्या वास्तव्यातल्या  महत्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकलेला ह्या नाट्यकृतीतून दिसून येईल.


वीर सावरकरांच्या भूमिकेत फर्जंद फेम अभिनेता निखील राऊत दिसणार आहे. अभिनेता निखील राऊत आपल्या भूमिकेविषयी म्हणाला, “ सावरकरांवरच्या महानाट्यात त्यांची भूमिका रंगवायला मिळणे हे माझे भाग्यच. सावरकरांमधला उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, प्रभावी वक्ता, कुसुमकोमल कवी ते अगदी हृदयस्पर्शी माणूस आणि समजूतदार नवरा अशा त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक छटा तुम्हांला पाहायला मिळतील.”


नाटकामध्ये अभिनेता निखील राऊतशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री नीलम पांचाल मुख्य भूमिकेत आहेत. नाटकाचा पहिला शो गणेश कलाक्रिडा रंगमंच, पूणे इथे होणार आहे.