नेरळ मधून अकोला ला निघालेले 25 जणांना नेरळ पोलिसांना थांबवले.. 571 किलोमीटर चालणार होते सर्व

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळ मधून अकोला ला निघालेले 25 जणांना नेरळ पोलिसांना थांबवले..

571 किलोमीटर चालणार होते सर्व

कर्जत,ता.30 गणेश पवार

             अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातुन आलेले कामगार कर्जत तालुक्यात काही कामधंदा नाही म्हणून पुन्हा घरी जायला निघाले होते.नेरळ येथून दुपारी अकोला असा 571  किलोमीटर प्रवास पायी करणाऱ्या 25 जणांना नेरळ पोलिसांना अडवले आणि त्यांची राहण्याची तसेच जेवणाचे साहित्य देऊन मदत केली. दरम्यान,त्यात एक दोन महिन्याचे लहान बाळ असून त्यांची स्थानिक कार्यकर्त्यांकडून एका स्वतंत्र खोलीत राहण्याची व्यवस्था केली आहे.

               कर्जत तालुक्यातील वीटभट्टी आणि रस्त्यांच्या कामात कामगार म्हणून काम करण्यासाठी विदर्भातील अकोला जिल्ह्यातून कामासाठी आले होते.दरवर्षी हे पावसाळा संपला की कामगार घरातून बाहेर पडतात आणि पुन्हा मे महिन्यात आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघतात.कोरोना मुळे त्यांना गेल्या 20 दिवसांपासून कोणताही रोजगार नाही,त्यामुळे त्या 25 जणांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे अक्षय शेखर जाधव,अशोक दशरथ मोहिते,आधार हिरामण मोहिते,शेखर पांडुरंग जाधव,राजेश अशोक मोहिते, संकलश अशोक मोहिते,आयुष्य गजानन मोहिते सुरेश सुखदेव मोहिते ही पुरुष मंडळी आपल्या सोबत असलेल्या महिलांना घेऊन नेरळ येथून कळंब रस्त्याने आज निघाले होते.नेरळ येथून धामोते जवळ असताना त्या भागातील म्हसे यांनी त्याबाबत माहिती पोलिसांना दिली.तर त्यांच्या गटातील काही हे दहिवली पूल येथे तेथील उपसरपंच यशवंत भवारे यांना दिसले.त्यांनी देखील त्यांना त्याच ठिकाणी थांबवले आणि नेरळ पोलिसांना फोन करून माहिती दिली.हे सुरू असताना मालेगाव येथील स्मिता बाग चे मालक राहुल सावळाराम जाधव यांनी आपल्या फार्म हाऊस मध्ये नेऊन जेवण दिले.

             मग नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील,पोलीस उपनिरीक्षक तात्या सावंजी,पोलीस शिपाई समीर भोईर हे नेरळ पासून दहिवली येथे पोहचले आणि त्यांनी त्या सर्व 25 जणांना परत धामोते येथे आणले.मात्र त्या 25 जणांमध्ये एक दोन महिन्यांची बाळंतीण महिला होती आणि ती पूजा गजानन मोहिते ही महिला आपल्या दोन महिन्याचे पूजा या मुलीसह चालत होती.ते पाहून नेरळ पोलीस थक्क झाले आणि त्यांनी धामोते येथील वीट भट्टी मालक जगदीश पेरणे यांनी तेथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारती मध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.त्या सर्व 25 जणांच्या कुटुंबाला सायंकाळी नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस यांनी भवानी नगर येथे त्यांची राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी आठ दिवस पुरेल एवढे धान्य नेऊन दिले आहे.तसेच त्या दोन महिन्याचे बाळाची व्यवस्था एका चांगल्या जागेत केली आहे.त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या ओडिशा राज्यातील दोन कुटुंबाला देखील नेरळ पोलिसांनी धान्य दिले असून कोणीही पुढील आठ दिवस या ठिकाणावरून हळू नये अशी तंबी देखील दिली आहे.धान्य वाटप नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील,पोलिस उपनिरीक्षक तात्या सावंजी, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळाजी जाधव,पोलीस नाईक समीर भोईर आणि उद्धव पाटील हे त्यावेळी उपस्थित होते.नेरळ पोलिसांनी दाखवलेली माणुसकी आणि त्यांनी 571 किलोमीटर चालून आपले घर गाठण्यासाठी निघालेली 25 जणांना थांबवून ठेवले आहे.