औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा द्यावी* *विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा द्यावी*


*विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर*


पुणे,दि.१६: 'कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम' ची मुभा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी केले.
 
     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आज डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.


 डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना साठी ठोस औषध तयार झाले नसून रुग्णाच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जगभरातील बहुतांश देश या विषाणूने बाधित झाले आहेत. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, उद्योग क्षेत्रात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत वाढ होवू नये, यासाठी औद्योगिक संस्थांनी गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करु नयेत.  रुग्णांशी संपर्क येणाऱ्या डॉक्टर व नर्स साठी मास्क वापरणे अत्यावश्यक असून सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी म्हणून खोकताना व शिंकताना केवळ रुमालाची घडी नाक व तोंडाजवळ धरावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर यांनी विलगीकरण, मास्क वापरण्याची व हात धुण्याची शास्त्रोक्त पध्दत, साफसफाई चे महत्त्व, औद्योगिक संस्थांनी करावयाचे प्रयत्न आदी विषयी माहिती दिली.


     यावेळी डॉ. व्यंकटेशम, श्री. सुरवसे व डॉ. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.
     बैठकीला जिल्ह्यातील हिंजवडी, चाकण, रांजणगाव, भोसरी, पिंपरी- चिंचवड आदी औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक, प्रतिनिधी यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन देत विविध प्रश्न उपस्थित केले, त्यास डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर उत्तरे दिली.
    00000