*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
अभिरुचीसंपन्नतेसाठी ग्रंथ प्रेरणा देतात
सतीश जकातदार : लाखमोलाचा ग्रंथठेवा ग्रंथालयांना भेट
प्रतिभावान कलावंत चंद्रकांत गोखले जन्मशताब्दीनिमित्ताने विक्रम गोखले यांचा उपक्रम
पुणे : ‘क्षेत्र कोणतेही असो ज्ञानाची भूक भागविण्यासाठी व अभिरुची संपन्नतेसाठी वाचनाला पर्याय नाही, ग्रंथ वाचनामुळे आपल्याला आयुष्यात प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सतीश जकातदार यांनी केले.
प्रतिभावान कलावंत चंद्रकांत गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जकातदार यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी प्रसंगी ते बोलत होते. चंद्रकांत गोखले जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांनी वैयक्तिक संग्रहातील भेट दिलेल्या पंधराशेहून अधिक ग्रंथांचा यात समावेश होता. वाचनसंस्कृतीचा निरपेक्षवृत्तीने प्रसार करणा-या निवडक ग्रंथालयांना हे ग्रंथ जकातदार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.
या प्रसंगी या उपक्रमाचे समन्वयक प्रसाद भडसावळे, रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे प्रभारी सचिव भारत वेदपाठक, प्रभारी मुख्याध्यापिका दीपमाला धायगुडे, विद्या जकातदार उपस्थित होते.
‘प्रेरणा देणारी पुस्तके वाचकांच्या अभिरुचीत संपन्नता आणतात. यासाठीच ग्रंथ, ग्रंथालय व व्यासंगी ग्रंथपाल सहवासात असणे गरजेचे आहे.’ असे जकातदार यांनी सांगितले.
या उपक्रमाचे समन्वयक संदर्भतज्ज्ञ प्रसाद भडसावळे म्हणाले, ‘ विक्रम गोखले स्वत: उत्तम वाचक आहेत. दर्जेदार साहित्याचा विपुल साठा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आज ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, हे पटल्याने त्यांनी वडिल चंद्रकांत गोखले यांची जन्मशताब्दी व मराठी दिनाचे औचित्याने हे ग्रंथ भेट दिले आहेत.'
याप्रसंगी राजगुरुनगर, अंबेजोगाई, वेल्हे येथील ग्रथांलयांचे प्रतिनिधी, सैनिकी विद्यालय, गडचिरोली, पुण्यातील गणेशमंडळांचे ग्रंथालय प्रतिनिधी, वृध्दाश्रम, संस्कारकेंद्र, स्वरुपवर्धिनी, सिध्दार्थ वाचनालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना उपयुक्त अशी विक्रम गोखले यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील गोष्टींची पुस्तके, ग्रंथ या वेळी जकातदार यांच्या हस्ते भेट देण्यात आली. कार्यक्रमास शिवाजीराव मोहिते, दिलीप भिकुले, जनार्दन इंगळे, नितीन क्षिरसागर, उत्तम साळवे, अशोक रावळ, संतोष कोंढेकर, पियुश शहा, प्रसन्न पाध्ये, विजय केळकर, नरहरी पाटील, भाविका सपकाळे आदी उपस्थित होते. प्रसाद भडसावळे यांनी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.
फोटो ओळ : अभिनेता चंद्रकांत गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने व मराठी भाषिकांचे औचित्य साधत विक्रम गोखले यांनी भेट दिलेल्या ग्रंथांसोबत सतीश जकातदार, प्रसाद भडसावळे, भारत वेदपाठक व विविध ग्रंथालयातील प्रतिनिधी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*