*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या सहा जणांना कर्जत प्रथम वर्ग न्यायालयाकडून जामीन मंजूर....
अपहरण झालेले सरेंडर
कर्जत,दि. 27 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे 20 फेब्रुवारी रोजी साडे अकरा वाजता चार पांढऱ्या रंगाच्या गाड्यामधून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केले होते.उल्हासनदी मध्ये एक किलोमीटर धावत जात अपहरण करण्यात आल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात येताच कर्जत पोलिसांनी दाखवलेली सतर्कता यामुळे अवघ्या चार तासात अपहरणकर्ते यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या,परंतु खंडणी साठी अपहरण करणारे ते सहा जणांना कर्जतच्या प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.परंतु या गुन्ह्यातील अपहरण झालेला तरुण सरेंडर झाल्याने जिल्हा सत्र न्यायालय ऐवजी कर्जत प्रथम वर्ग न्यायालयात त्या सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला.
गणेश अनंता घारे हे 35 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसह 20 फेब्रुवारी रोजी रात्री कर्जत सांगवी येथील उल्हासनदी मध्ये अतुल घारे आणि रमेश घारे यांच्यासोबत गप्पा मारत असताना रात्री अकरा च्या दरम्यान तेथे नदीच्या बाजूला रस्त्यावर चार पाच पांढऱ्या रंगाच्या गाड्या मधून आलेल्या अज्ञात लोकांनी अपहरण करून नेले होते.त्यावेळी गणेश घारे यांच्या बरोबर असलेले तरुण हे धावत सांगवी गावात पोहचले आणि तेथे घडलेली घटना गणेश घारे यांच्या घरी सांगितली. त्यानंतर अपहरण झालेले तरुण गणेश घारे यांचे बंधू योगेश अनंता घारे यांनी बारा वाजता कर्जत पोलीस ठाणे गाठले.तेथे कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे आपल्या भावाचे अपहरण केले असल्याची तक्रार केली.मात्र त्याचवेळी गणेश घारे यांच्या घरी असलेल्या मोबाईल वर एक फोन आला आणि त्यांनी तुमचा माणूस माझ्याकडे नेरळला आहे असे सांगितले होते.
या माहितीच्या आधारे कर्जत पोलिसांनी नेरळ पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला आणि पहाटे कर्जत पोलीस नेरळ येथे पोहचले.तेथे पोलीस निरीक्षक भोर,पोलीस उपनिरीक्षक गावडे यांच्या मदतीला नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील हे सर्व नेरळ गावातील आनंद वाडी येथे पोहचले आणि तेथे अपहरण करण्यात आलेल्या गणेश अनंता घारे यांना ज्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते,तेथून पोलिसांनी प्रथम गणेश घारे यांची सुटका करून अपहरण करणाऱ्या सहा जणांना त्यांनी वापरलेल्या दोन वाहनांसह कर्जत येथे नेले.फिल्मी स्टाईलने करण्यात आलेल्या या अपहरण घटनेत गणेश घारे यांचे अपहरण केल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भादवी कलम 163,34 खाली गुन्हा नोंद करण्यात आला होता.नंतर पकडून नेऊन पैशाची मागणी केल्याने कर्जत पोलीसांनी आरोपींवर खंडणी आणि अपहरण या दोन गुन्ह्यात सर्व सहा जणांवर भादवी कलम 364अ गुन्हा नोंद झाला होता. त्या सर्वांना कर्जत पोलीसांनी अटक करून कर्जत प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात 21 फेब्रुवारी रोजी हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
मात्र खंडणी साठी अपहरण करून जबर मारहाण झाल्याने कर्जत पोलिसांनी अपहरणकर्त्यावर खंडणी साठी मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.त्यामुळे कर्जत प्रथम वर्ग न्यायालयाने त्या सर्व सहा जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.त्यामुळे पुढील सुनावणी पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात होणे अपेक्षित होते.परंतु पोलीस कोठडी संपण्याआधी कर्जत पोलिसांनी त्या सर्व सहा जणांना पुन्हा कर्जत प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले आणि त्यांचा जामीन मंजूर केला असून सर्वांची सुटका झाली आहे.या प्रकरणी अपहरण झालेले तरुण गणेश अनंता घारे यांनी आरोपी असलेले राजू मरे यांच्याकडून पैसे घेतले होते आणि त्यासाठी आपल्याला नेण्यात आले असा जबाब कर्जत प्रथम वर्ग न्यायालयात दिला.परिणामी त्या गुन्ह्यातील कलम 363 आणि 364 अ या गुन्ह्यातील गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले.परिणामी त्या सर्व सहा जणांना पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामीन घेण्यासाठी उभे करण्याऐवजी कर्जत प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात येऊन त्यांचे जामीन न्यायालयाने मान्य केले.दरम्यान,फिल्मी स्टाईलने अपहरण झाले हा प्रकार खरा नव्हता तर घेतलेले पैसे देत नाही म्हणून गणेश घारे यांना नेले होते ही बाजू प्रथम वर्ग न्यायालयाच्या निर्णयाने समोर आली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*