तुमच्या नाकाखाली स्वतंत्र काश्मीरची मागणी, उद्धवजी पटतंय का? - देवेंद्र फडणवीस
__________________________________
मुंबईत स्वतंत्र काश्मीरचे नारे दिले जात आहेत. मुंबईत हे अशाप्रकराचं आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहन कसं काय करु शकतात? मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किमी अंतरावर स्वतंत्र काश्मीरचे नारे दिले जात आहेत. आझादी गँग इथवर येऊन ठेपली आहे. तुमच्या नाकाखाली या गोष्टी घडत आहेत. हे सगळं तुम्हाला पटतंय का उद्धवजी? असासवाल करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर हे आंदोलन नेमकं कशासाठी होतं आहे? स्वतंत्र काश्मीरची मागणी होते आहे ती देखील मुंबईत? तुम्ही हे सगळं मुंबईत कसं काय सहन करु शकता? असा प्रश्न विचारला आहे.दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ(JNU ) संकुलात रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनात रविवारी काही विद्यार्थी जखमी झाले. जेएनयूची अध्यक्ष आइशी घोषने या प्रकरणी तातडीने चौकशी सुरु करण्याची मागणी केली. तसेच आमच्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता असाही आरोप केला. मी स्वतः पोलिसांना फोन केला होता. पोलिसांनी हे आश्वस्त केलं होतं की कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. तरीही ७० च्या आसपास लोक इथे आले आणि त्यांनी आम्हाला रॉडने मारण्यास सुरुवात केली. दरम्यान याच सगळ्या घटनेचे पडसाद मुंबई आणि पुण्यातही उमटले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी झालेल्या आंदोलनावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये फडणवीस म्हणतात, ” मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर स्वतंत्र काश्मीरचे नारे दिले जात आहेत. हे आंदोलन मुंबईत कशासाठी होतं आहे? आझादी गँग मुंबईत येऊन ठेपली आहे आणि नारेबाजी करत आहे. हे सगळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाकाखाली सुरु आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य आहेत का? ”दरम्यान मुंबईत सुरु असलेल्या जेएनयूच्या आंदोलनाला बॉलिवूडच्या कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला आहे. अनुराग कश्यप, राहुल बोस, तापसी पनू, अनुभव सिन्हा, झोया अख्तर, दिया मिर्झा यांनी कार्टर रोड या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनात उपस्थिती दर्शवत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.