प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न

प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न


जगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा चित्रपट ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच बॉलीवूडमधील दिग्गज गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट तसेच सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांच्या हस्ते संपन्न झाला. सलीम-सुलेमान या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही प्रसिद्ध जोडी आता ‘प्रवास’ चित्रपटाच्या निमित्ताने संगीतकार म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे.


प्रत्येकाच्या अंत:करणाला स्पर्श करणारा हा प्रवास असेल, असं सांगत आपल्याला आयुष्याच्या प्रवासात साथ करणाऱ्या प्रत्येकाचे आभार अभिनेता अशोक सराफ यांनी मानले. माझ्यासाठी अविस्मरणीय ठरलेला हा प्रवास अशोक सराफ यांच्या साथीने आणखी चांगला झाला असं सांगत प्रेक्षकांनाही हा प्रवास भावेल असा विश्वास अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी व्यक्त केला. मराठीचा प्रवास करताना थोडं दडपण होतं पण चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या साथीमुळे आमच्या नव्या प्रवासाचा आनंद घेता आला, सोबत मराठीत वेगळं काम केल्याचा समाधान सलीम-सुलेमान यांनी याप्रसंगी व्यक्त केलं. जीवनाच्या प्रवासातले वेगवेगळे कंगोरे दाखवत हा जीवन प्रवास कसा सुखकर होईल हे सांगणारा हा ‘प्रवास’ प्रत्येकाला समृद्ध करेल असा विश्वास लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर व्यक्त करतात. उत्तम कथानक असलेल्या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची व सलीम-सुलेमान यांच्यासोबत काम करण्याचा आनंद गीतकार गुरु ठाकूर यांनी व्यक्त केला. चित्रपटगृहात जाऊन प्रत्येकाने हा प्रवास अनुभवावा असं निर्माते ओम छंगानी यावेळी सांगितले.


कुणा न टळला, कुणान कळला जगण्याचा हा अवघड घाट...


कुणी न जाणे वळणा नंतर, कुठे नेमकी सरते वाट... प्रवास... प्रवास... हा प्रवास


अशा गीतकार गुरु ठाकूर यांच्या समर्पक शब्दांनी यातील गीते सजली आहेत. सोनू निगम, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, हरीहरन या आघाडीच्या गायकांचा स्वरसाज या गीतांना लाभला आहे. प्रवास'च्या संगीताची खासियत म्हणजे याचं आॅर्केस्ट्रेशन झेक प्रजास्ताकाची राजधानी प्रागमध्ये करण्यात आलं आहे.


ओम छंगानी फिल्म्स निर्मित प्रवास या चित्रपटात अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकार आहेत. या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे. कलादिग्दर्शक महेश साळगांवकर तर संकलन संजय सांकला यांचे आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांची आहे. पवन पालीवाल कार्यकारी निर्माते आहेत. अनिल थडानी या चित्रपटाचे वितरक आहेत.