पालकांनो नकारात्मक, निराशाजनक पद्धतीने मुलांशी बोलू नका – उल्हासदादा पवार

कृपया प्रसिद्धीसाठी                                               १ जानेवारी २०२०


पालकांनो नकारात्मक, निराशाजनक पद्धतीने मुलांशी बोलू नका – उल्हासदादा पवार


पुणे – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व असलेले पु. ल. देशपांडे हे सकारात्मक उर्जेचा मोठा स्त्रोत होता, आजही आहेत. त्यांच्या नावाने हे संमेलन होत आहे. मंचावर सकारात्मक विचारातून काय साध्य करता येते याचे मूर्तीमंत उदाहरण सुयशच्या रूपाने आपल्या समोर आहे. त्यामुळे या संमेलनातून पालकांनी, आपल्या मुलांशी हे करू नको....तुला हे येणार नाही, ते करू नको अशा नकारात्मक, निराशाजनक पद्धतीने बोलू नये असाच बोध घ्यावा, असे आवाहन पुलोत्सव संमेलनाचे अध्यक्ष माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी आज येथे केले. 


राजर्षि शाहू विद्यामंदीर आणि शांताबाई शिवराम पवार ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी पुलोत्सव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. अध्यक्षस्थानी उल्हासदादा पवार होते. यावेळी ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पॅरा जलतरणपटू सुयश जाधव, त्याला प्रोत्साहन देणारे त्याचे वडिल नारायणराव जाधव, संस्थेचे संस्थापक प्राध्यापक व्ही. एस. अंकलकोटे पाटील, प्राचार्य. डी. डी. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.


पवार म्हणाले, मुलांकडे बघताना आणि त्यांच्याशी संवाद साधताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवला की काय होते हे नारायण जाधव यांनी सुयशच्या रूपाने साध्य करून दाखवले आहे. सुयशने दोन्ही हात गमावल्यानंतरही त्यांने वडिलांचे स्वन्प पूर्ण केले. यामागे दिव्यांग सुयशला सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वागवणारे त्याचे पालक आहेत. त्यांनी सुयशच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने आज तो चांगला खेळाडू आणि क्रिडाअधिकारीही झाला आहे. यातून आणि संमेलनात सादर होणा-या पु.ल.देशपांडे यांच्या कलाकृतीतून पालकांनी आपल्या मुलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याचा बोध घ्यावा.  त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव द्यावा आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तीमत्व घडवण्यावर भर द्यावा.


संमेलनाचे उदघाटक डॉ. मिलिंद जोशी म्हणाले, आपण ही संस्था अद्याप बघितलेली नाही, पण या पुलोत्सव संमेलनातील सादरीकरणातून ही एक कल्पक आणि सृजनशील संस्था आहे याची खात्री पटली. पालकांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना रेसचा घोडा बनवू नये तर त्यांचे सर्वांगिण व्यक्तीमत्व घडवण्यावर भर द्यावा. त्यासाठी शिक्षकांनीही शाळेत मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण देण्याबरोबरच त्यांना “जीवन” नावाचे पुस्तक शिकवावे. यावेळी त्यांनी आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांचा साहित्य संमेलनात एका व्यासपीठावर असतानाचा प्रसंग विषद केला. त्यानंतर स्व. शिवाजीराव सावंत यांनी शालेय जीवनात शाळेतील संमेलनात महाभारतातील प्रसंगावर आधारित नाटकात श्रीकृष्णाची भूमिका तर त्यांच्या मित्राने कर्णाची भूमिका केले होती. सावंत त्यांच्या मृत्युंजय कादंबरीची मूळ तिथे रूजली. पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या आय़ुष्यातील पहिले भाषण शाळेतील संमेलनात दिले अशी आठवण सांगून या संमेलनांची उपयुक्तता पटवून दिली.


सुयश जाधव याने मनोगातात आपण दिव्यांग कसे झालो व त्यानंतर जलतरणपटू कसे घडलो याची हकिकत विषद केली. त्याने सांगितले की, पालकांनी मुलांकडे सकारात्मक दृष्टीने बघितले की ऑलिंपिकला मेडल मिळवणारा सुयश तयार होऊ शकतो. पालकांनीही अभ्यासापलिकडे जाऊन मुलांच्यातील सुप्त गुण हेरून त्यांना प्रोत्साहन द्यावे. यशासाठी त्याने ट्रीपल “सी” म्हणजे कसिस्टंटसी, कॉन्सनट्रेशन आणि कॉन्फिडन्स म्हणजेच सातत्य, एकाग्रता आणि विश्वास ही त्रिसुत्री मुले व पालकांना सांगितली.


संस्थेचे अध्यक्ष प्रा. अंकलकोटे पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, इयत्ता बारावीपर्यंत मराठी माध्यमाची ही शाळा असून येथे मराठी, हिदी आणि इंग्रजी बरोबरच संस्कृत भाषाही शिकवली जाते. शाळेतून हद्दपार झालेली पावकी, निमकीही मुलांना शिकवली जाते. शाळेत उस लागवड, भात लागवड असे वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह शिकवले जातात. संकल्पनेवर आधारीत संमेलन घेतले जाते, म्हणून यंदाचे पुलोत्सव संमेलन हे पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताव्दीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी घेतले आहे. शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांना सादरीकरणाचे व्यासपीठ देणारी आमची एकमेव संस्था आहे. शेवटी प्राचार्य डी. डी. सूर्यवंशी यांनी आभार मानले.


कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती वंदनाने झाली. त्यानंतर पु. लं देशपांडे यांच्या व्यक्तीमत्वावर आधारित आमचा प्रोजेक्ट झालाय......ही नाटिका सादर करण्यात आली. पु. लंच्या नाच रे मोरा सारख्या गाण्यांवर नृत्येसादर केली. त्यांच्या ती फुलराणी नाटकातील तुला शिकवीन चांगलाच धडा हे स्वगत, अशा पु. लंच्या कलाकृतींवर आधारित नाट्यछटा, नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली.


सोबत फोटो आहे.


फोटो ओळ : डावीकडून उल्हासदादा पवार, मिलिंद जोशी, सुयश जाधव, प्रा. व्ही. एस. अंकलकोटे पाटील, नारायण जाधव, प्राचार्य सूर्यंवंशी