मनसेच्या स्टेजवर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा

मनसेच्या स्टेजवर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा
_________________________________


स्वातंत्र्यवीर सावरकर
मुंबईत होत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या तयारीदरम्यान अनेक नव्या गोष्टी पहायला मिळत आहेत. यातील एक विशेष बाब म्हणजे या अधिवेशनात स्टेजवर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. यांमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली आहे.
गोरेगाव येथील ज्या नेस्को मैदानातील सभागृहात हे अधिवेशन पार पडणार आहे. यावेळी मनसेचं रिलॉन्चिग होणार आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय क्षेत्रात लॉन्चिंग केले जाणार असल्याची चर्चा आहे.


यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले जाणार आहे. यासाठी सभागृहात भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. या स्टेजवर महापुरुषांच्या फोटोंमध्ये प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा पहिल्यांदाच ठेवण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांचाही यामध्ये समावेश आहे.